प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

पोलीसनामा ऑनलाइन – तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा झटका आल्याने चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. विवेक यांना अतिदक्षता विभागात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. विवेक हे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी त्यांच्या स्वास्थासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी पोस्ट लिहिल्या आहेत.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, विवेक हे त्यांच्या राहत्या घरीच छातीत दुखत असल्याने कोसळले. त्यानंतर पत्नी आणि मुलीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. 59 वर्षीय विवेक यांनी कालच कोरोनाची लस घेतली होती. लशीचा डोस घेतल्यानंतर त्यांनी चाहत्यांनाही लस घेण्याचे आवाहन केले आहे. विवेक यांनी आतापर्यंत जवळपास 150 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा धरला प्रभू हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. अरण्मनई- 3, इलामई इधो इधो आणि इतरही तमिळ चित्रपटात ते झळकणार आहेत.