प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ED कडून कसून चौकशी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कसून चौकशी झाली. भोसले यांचे बड्या राजकीय पुढार्‍यांसोबत निकटचे संबंध आहेत. मात्र, यास दुजोरा मिळू शकला नाही. ईडीच्या परिमंडळ 2 च्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भोसले यांना मुंबईतील बल्लार्ड पियर येथे असणाऱ्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावून घेतले होते. सकाळी दहा वाजता भोसले ईडी कार्यालयात दाखल झाले. बातमी राजकीय क्षेत्रात वेगाने पसरली. रात्री आठ वाजेपर्यंत भोसले यांच्या कार्यालयात होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. भोसले यांच्यासह राज्यातील अन्य उद्योजकांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र, त्याची खातरजमा होऊ शकली नाही. केवळ त्यांची चौकशी करण्यात आली. पुण्यातही त्यांच्या बंगल्यावर या पथकाने चौकशी केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची पथके शुक्रवारी दुपारी पुण्यात दाखल झाली होती. भोसले यांची मुंबई चौकशी सुरू असताना त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही ईडीच्या पथकाने छापा टाकला. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. भोसलेंच्या बाणेर परिसरातील बंगल्यावर ही पथके पोचल्याचे सांगण्यात आले. भोसले यांना मुंबईत बोलवल्यावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासोबत अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भोसले यांच्यावर झालेली कारवाई राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. भोसले यांच्या चौकशीचा तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.

भोसले यांच्यावर यापूर्वी ही झाली होती कारवाई

भोसले यांचा बांधकाम व्यवसाय पुण्यात आणि मुंबईत आहे. देशभर त्यांची कंपनी पायाभूत बांधकाम क्षेत्रात काम करते. त्यांच्या कंपनीची मुख्य शाखा पुण्यात आहे. भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ साली अमेरिका, दुबई दौरा करून भारतात येताना परकीय चलन व महागड्या वस्तू अबकारी शुल्क (कस्टम ड्युटी) न भरता चोरून आणलेल्या बाबतीत ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. शिवाजीनगरच्या यशवंत घाडगेनगरमधील जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून भोसले यांच्यासह सहा जणांच्या विरोधात २०१६ साली चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध राजेश बजाज यांनी फिर्याद दिली होती. भोसले यांच्यावर यापूर्वी प्राप्तिकर विभागाचे छापे टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यावेळी त्यांचे जावई आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या कार्यालयावरही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती.

रिक्षाचालक ते बांधकाम व्यावसायिक

पुण्यातील रिक्षाचालक म्हणून काम करणारे भोसले यांनी अल्पावधीत बांधकाम क्षेत्रात काम सुरु केले. १९९५ मध्ये राज्यात सत्तेत शिवसेना भाजपा सरकारच्या काळातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून भोसले यांचा प्रचंड विकास झाल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी साधलेली प्रगती डोळे दीपवणारी आहे. पंचतारांकित हॉटेल, राज्यभरात मालमत्ता त्यांच्या कंपनीकडे आहे. मात्र रिक्षावाला ते बडा बांधकाम व्यवसायिक हा त्यांच्या आर्थिक प्रगतीचा वेग नेहमी चर्चेत राहिला आहे.