Saroj Khan dies of cardiac arrest : ‘बॉलिवूड’ला आणखी एक मोठा झटका, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं मुंबईत निधन

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुप्रसिद्ध कोरिओग्राफर 72 वर्षीय सरोज खान यांचे आज निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी पहाटे 1 वाजून 52 मिनिटांनी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्या आजारी असल्याकारणाने त्यांची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली. पण रिपोर्ट निगेटीव्ह आला होता.

माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यासह अनेक सुपरस्टार्सना सरोज खान यांनी डान्स शिकवला होता. त्यांना श्वसनाच्या समस्येमुळे 17 जून रोजी वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल केले होते. पण आज पहाटेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

विशेष म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांनी बँकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1974 मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे सरोज खानला स्वतंत्र कोरिओग्राफर म्हणून ब्रेक मिळाला होता. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सरोज खान यांनी 2000 हून अधिक गाण्यांचे कोरिओग्राफ केले आहे. यामध्ये मिस्टर इंडिया (1987) चित्रपटातील हवा हवाई, तेजाब (1988) मधील एक दो तीन, बेटा (1992) मधील धक धक करने लगा, देवदास (2002) मधील डोला रे डोला या गाण्यांचा समावेश आहे.