SAD NEWS : ‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता… आता तरी देवा मला पावशील का?’ या गाण्याचे गीतकार हरेंद्र जाधव यांचं 87 व्या वर्षी निधन

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता… आता तरी देवा मला पावशील का? पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा आदी एकापेक्षा एक सरस गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे लोककवी हरेंद्र जाधव (वय 87) यांचे रविवारी (दि. 25) दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून जाधव हे पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. अखेर प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत आज मालवली. भावगीत, भक्ती गीतातून प्रबोधन करणारे कवी म्हणून त्यांची ख्याती होती.

हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. जाधव हे पेशाने शिक्षक होते. त्याचबरोबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. देवा मला का दिली बायको अशी, माझ्या नवऱ्यान सोडलिया दारू, हा संसार माझा छान, राव दिला मला देवाने, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी 10 हजाराहून अधिक गाणी जाधव यांनी लिहली आहेत. तसेच, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवालपासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक, गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत.