कल्याणमधील प्रसिद्ध ज्येष्ठ वकील जुबेर काझी यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याणमधील प्रसिद्ध ज्येष्ठ व अभ्यासू वकील जुबेर काझी (वय-68) यांचा आज (मंगळवार) कोरोनामुळे मृत्यू झाला. जुबेर काझी हे पापा काझी या नावाने परिचित होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

जुबेर काझी यांना सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. त्यांच्यावर प्लाझ्मा उपचार पद्धतीने उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करीत होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश न आल्याने काझी यांचा मृत्यू झाला.

वकिलीचे शिक्षण त्यांनी मुंबईतून घेतले. सुरुवातीच्या काळात त्यांना ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध वकिल प्रभाकर हेगडे यांचे मार्गदर्शन मिळाले. अभ्यासाच्या जोरावर ते प्रसिद्ध वकिल झाले. गरिबांच्या केसेस ते मोफत लढत होते. कल्याण, ठाणे, मुंबईत त्यांनी वकिलीची प्रॅक्टीस केली. कल्याण व भिवंडीच्या दंगलीतील मुस्लिम तरुणांची केस त्यांनी लढली होती. समाजातील सर्वच स्तरातील लोकांचे खटले त्यांनी लढविले होते. जातीय व धर्मीय सलोखा राहण्यासाठी त्यांनी वादी व प्रतिवाद्यांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील वाद मिटवण्याचे काम काझी यांनी केले.