Coronavirus Impact : शिर्डीपासून सिध्दिविनायकापर्यंत, ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर ‘हे’ सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता आज दुपारी 3 वाजेपासून महाराष्ट्रातील शिर्डी साई मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. शासनाचे आदेश येईपर्यंत मंदिर बंद राहील. परंतु साई मंदिरात नेहमीप्रमाणे पूजा व आरती सुरू राहतील. श्री साईबाबा संस्थान (शिर्डी) यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरातील अनेक प्रसिद्ध मंदिरे बंद झाली आहेत.

सिद्धिविनायक मंदिर-
याशिवाय मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही बंद करण्यात आले आहे. सिद्धिविनायक ट्रस्टने 16 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला. पुढील निर्णयापर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अशा सूचना महाराष्ट्र सरकारने दिल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात पुजारी मास्क घालताना दिसले होते आणि प्रवेश करण्यापूर्वी भाविकांच्या हातात सॅनिटायझर्स ठेवण्यात आले होते.

कामाख्या देवी मंदिर-
गुवाहाटीतील प्रख्यात कामाख्या देवी मंदिरात भाविकांना दिला जाणारा भोग पुढे ढकलण्यात आला आहे. गुवाहाटीच्या निलांचल पर्वतावर असलेल्या या मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या देखील 50% कमी केली आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था केली आहे. तसेच, भाविकांना हँड सॅनिटायझर्सही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी कॅम्पसमध्ये वैद्यकीय शिबिराची व्यवस्था केली आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर-
त्याचबरोबर महाराष्ट्रातील गणपतीचे आणखी एक प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरही कोरोनाच्या प्रभावामुळे तात्काळ बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 39 लोकांना कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.

महाकालेश्वर मंदिर-
कोरोना विषाणूच्या भीतीपोटी मध्य प्रदेशातील उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरदेखील भस्म आरतीनंतर आज सकाळी बंद करण्यात आले आहे.

वैष्णव देवी-
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील वैष्णव देवी श्राईन बोर्डाने मंगळवारी एक अ‍ॅडव्हायझरी प्रसिद्ध करुन अनिवासी भारतीय आणि परदेशी पर्यटकांच्या प्रवासावर 28 दिवसांसाठी बंदी घातली आहे.