गुढकथाकार हरपला ! ज्येष्ठ नाटककार साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि गुढकथाकार रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता ४ दिवसांपूर्वी त्यांना गोदरेज हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेच रविवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे देहावसान झाले.

रत्नाकर मतकरी यांचा १९३८ मध्ये जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी १९५५ मध्ये त्यांची वेडी माणसं ही एकांकिका मुंबई आकाशवाणीवरुन प्रसारित झाली. तेव्हापासून त्यांचे लेखन अव्याहतपणे सुरु होते.
मतकरी यांचे अलबत्या गलबत्या  आणि महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित आरण्यक ही नाटके सध्या पुन्हा रंगभूमीवर गाजत आहेत. वास्तवाचे भान देणार्‍या गूढकथा हा कथा प्रकार यांनी नावारुपाला आणला.

मतकरी यांच्या लोककथा ७८, दुभंग, अश्वमेध, माझं काय चुकलं, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवं, खोल खोल पाणी, इंदिरा आणि इतर अनेक नाटके, तसेच अलबत्या गलबत्या आणि निम्मा शिम्मा राक्षस ही बालनाटये चांगलीच गाजली आहेत.

मोठ्यासाठी ७०, तर मुलांसाठी २२ नाटके लिहिली. याशिवाय अनेक एकांकिका, २० कथासंग्रह, ३ कांदबर्‍या, १२ लेखसंग्रह आणि रंगभूमीवरील कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ माझे रंगप्रयोग अशी विपूल साहित्य संपदा आहे.

त्यांना इन्वेस्टमेंट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्रास्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो.

त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक, समीक्षक गणेश मतकरी, जावई मिलिंद विनोद, स्नुषा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे असा परिवार आहे