हौसेला मोल नाही ! ‘या’ फॅन्सी नंबरसाठी मोजले 10 लाख रुपये

पोलिसनामा ऑनलाईन – हौसेला मोल नसते, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला अनेकजण तयार असतात. असेच काहीसे दिल्लीतील तरुणाच्या बाबतीत घडले आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटातही ‘0009’ या फॅन्सी नंबरसाठी त्याने तब्बल 10 लाख 1 हजार रुपयांची बोली लावल्याचे उघडकीस आले आहे.

आरटीओकडून नवीन मोटारीला फॅन्सी नंबरसाठी दिल्लीमधील एका व्यक्तीने 10.1 लाख रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सप्टेंबरमध्येच ‘0003’ आणि ‘0007’ नंबरसाठीही प्रत्येकी 3.1 लाख रुपयांची बोली लागली होती. तर, जुलै महिन्यातही फॅन्सी नंबरसाठी बोली 7.1 लाखापर्यंत गेली होती. फॅन्सी नंबरच्या ई- लिलावाद्वारेच आरटीओने ऑगस्टमध्ये 33.3 आणि जुलैमध्ये 33.8 लाख रुपयांची कमाई केली आहे. लॉकडाउनमुळे मार्च महिन्यात फॅन्सी नंबरसाठीचा ई-लिलाव बंद करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये लिलावास पुन्हा सुरूवात झाली. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात दिल्लीच्या आरटीओ फॅन्सी नंबर्सच्या ई-लिलावाद्वारे 99.6 लाख रुपयांची कमाई केली. मागील वर्षी याच काळात तब्बल 4.6 कोटी रुपयांची कमाई केली होती.