बुधवार पेठेतील वाड्यात घरफोडी करून पसार झालेल्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवार पेठेतील वाड्यात घरफोडी करून पसार झालेल्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या महिलांकडून चोरीला गेलेले २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (रा. मंगळवार पेठ) व अनिता नारायण हजारे (रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत. रूपाली कोकरे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बुधवार पेठेमधील पासोड्या विठोबा मंदिराजवळ असलेल्या पालेकर वाड्यात कोकरे राहायला आहेत. त्या काही कामानिमित्त घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी शेख व हजारे वाड्यात शिरल्या. त्यांनी कोकरे यांच्या घराचा दरवाजा उचकटून २५ हजारांचे दागिने चोरले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही तपासले. त्यात या दोघी कैद झाल्या होत्या.

त्यानुसार त्यांचा शोध घेतला जात होता. यावेळी महिला मंगळवार पेठेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना सापळा रचून अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, अमोल सरडे, महावीर वलटे, सचिन सारपाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.