16 गर्लफ्रेंड्सचे शौक पुरवण्यासाठी चोरली BMW, मर्सिडीज सारख्या 50 कार, ‘या’ पध्दतीनं पकडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणा पोलिसांनी एका अशा चोराला अटक केली आहे, ज्याला 16 गर्लफ्रेंड आहेत. लक्झरी वाहने चोरणारा हा आरोपी आपल्या गर्लफ्रेंड्सचे छंद पुरवण्यासाठी महागड्या गाड्या चोरी करायचा. देशातील विविध राज्यातील 50 हून अधिक महागड्या गाड्या चोरणारा हा चोर हिसारचा रहिवासी असल्याचे समजले आहे. त्याला फरीदाबाद येथे गुन्हे शाखेने (सेक्टर-30 पोलिसांनी) अटक केली. लक्झरी कार चोरणाऱ्या या चोरट्याचे नाव रॉबिन उर्फ राहुल उर्फ हेमंत उर्फ जॉनी, रा. जवाहर नगर (हिसार) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रॉबिनने आपला वेष बदलून अनेक वेळा पोलिसांची देखील दिशाभूल केली आहे. त्याने प्रत्येक वेळी कार चोरीच्या घटना वेष बदलून घडवल्या आहेत. पकडल्यावर तो आपले पत्तेही वेगवेगळे सांगायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने हिसारमध्ये देखील अनेक महागड्या गाड्या चोरल्या आहेत. हिसार येथे त्याने पोलिसांना सुमारे 15 ते 20 वेगवेगळे पत्ते सांगितलेले आहेत.

पोलिसांनी केला हा दावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रॉबिन आता हिसारमध्ये राहत नाही. तो दुसऱ्या राज्यात वास्तव्य करीत आहे. आरोपी फक्त लक्झरी मोटारींवर हात साफ करायचा. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हिसार वगळता एनसीआरसह देशातील इतर राज्यांमधून लक्झरी वाहने चोरली आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की आरोपीला 16 गर्लफ्रेंड आहेत आणि तो त्यांचे आणि स्वतःचे छंद पूर्ण करण्यासाठी गाड्या चोरत असे.

याआधीही त्याला अटक झालेली आहे
आरोपीला सुमारे एक वर्षापूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. अलीकडेच तो तुरूंगातून बाहेर आला व त्याने पुन्हा कार चोरी करण्यास सुरवात केली. 31 ऑगस्ट रोजी त्याने सेक्टर-28 फरीदाबादमध्ये घराबाहेर पार्क केलेल्या फॉर्च्युनर कारची चोरी केली होती. गुन्हे शाखेने हे प्रकरण सोडवले आहे. त्याने गाझियाबाद, जोधपूर येथून फॉर्च्युनर व गुरुग्राम येथून जीप चोरल्याची कबुलीही दिली आहे. गुन्हे शाखेने तेथील पोलिसांना कळविले आहे.