पतीला गोळ्या घातल्या तर पत्नीचं धड केलं वेगळं, फिल्मी स्टाईलनं चौघांनी केली दाम्पत्याची हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिल्मी स्टाईलने चौघांनी एका दाम्पत्याची हत्या केल्याची घटना फरिदाबाद येथे मंगळवारी (दि.11 ऑगस्ट) रात्री उशिरा घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या हत्या प्रकरणाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे समजत आहे. सीसीटीव्हीव्दारे पोलिसांना मारेकर्‍यांची ओळख पटली आहे. या घटनेनंतर मारेकरी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चार तरुणांची ओळख पटलीय. या चौघांचा शोध घेणे सुरू केलं आहे. या घटनेत संशयित आरोपींनी फिल्मी स्टाइलने या दाम्पत्याची हत्या केली असून यात अगोदर दाम्पत्याचे हात-पाय बांधले, त्यानंतर पतीला गोळी मारली. अन् महिलेचं डोकं भिंतीला आपटले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीर (पती) मोनिकाला (पत्नी) मंगळवारी (दि.11 ऑगस्ट) डॉक्टरकडे घेऊन जात होते. तेथून दोघंही रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतले. त्यानंतर मोनिका घराजवळ असलेल्या वडिलांच्या डेअरीमध्ये दूध घेण्यासाठी दररोज येत होती. मात्र, मंगळवारी न आल्यानंतर त्यांनी मोनिकाला फोन केला. मात्र, तिचा फोन बंद लागला.

मंगळवारी (दि.11 ऑगस्ट) रात्री 9 वाजता मोनिकाचा भाऊ मनीष तिच्या घरी आला. घरात अंधार पाहून त्याने लाइट लावली असता त्याला सुखबीर आणि मोनिका हे रक्तबंबाळ अवस्थेत दिसले. आपल्या बहिणीची हि अवस्था पाहून मनीष किंचाळू लागला, त्याच्या आवाजाने शेजारचे लोक जमा झाले.

ही वृत्त समजताच गावातील सर्व लोक आणि कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच डीसीपी, एसीपी गुन्हे शाखा आणि इतर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

ते संशयित आरोपी 41 मिनिटे होते घरात
या घटनेचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यात असे आढळले आहे की, मंगळवारी (दि. 11 ऑगस्ट) दुपारी 1.37 वाजता चार तरुण दोन दुचाकी घेऊन घरानजीकच्या रस्त्यावर आले. घराबाहेर दुचाकी उभी केली. तसेच दोघांची हत्या केल्यानंतर त्या आरोपींनी दुपारी 2.18 वाजता परत निघून गेले, असे सीसीटीव्हीत दिसले आहे.

यावेळी दोन तरुण अगोदर घराबाहेर आले, त्यांनी दुचाकी सुरू केली त्यानंतर घराच्या नजीक उभे राहिले. थोड्याच वेळात दोन तरुण घराबाहेर पळत येऊन दुचाकीवर बसून निघून गेले. त्यानंतर मारेकरी फरार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे आरोपी दिसत आहेत. त्यांची ओळख पटवली जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.