आज राज्यात शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – आज शेतकरी साहेबराव करपे तसंच त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात मंगळवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील विविध संघटनांसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही. मात्र, लोकसभा निवडणुकांतर्गत देशात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी होणारे हे आंदोलन यंदा आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे.

आचारसंहिते अंतर्गत उपवास करण्याला बंदी नाही, तरी अन्नत्याग आंदोलन असं नाव असल्याने प्रशासनाने यावर आक्षेप घेतला आहे.  किसान आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब हे राजघाटावर उपोषण करणार आहेत. आम्ही दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधिस्थळी राजघाट येथे उपवासावर ठाम असल्याचे अमर हबीब यांनी सांगितलं.

दरम्यान, १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपणा, दुष्काळी स्थितीला कंटाळून आपले जीवन संपविले होते. वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रमालगतच्या दत्तपूर येथे करपे यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली होती. ही शेतकरी आत्महत्या राज्यातील पहिली आत्महत्या म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाला श्रद्धांजली म्हणून दरवर्षी १९ मार्च रोजी राज्यभरात अन्नत्याग आंदोलन केले जाते.