GJ : PM आवास योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

सुरत; पोलीसनामा ऑनलाईन – देशात केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांना विरोध करत पंजाब आणि हरयाणातील शेतकरी अनेक दिवस दिल्लीच्या सीमारेषेवर ठिय्या मांडून आहेत. हिवाळा असल्याने गेल्या महिन्याभरापासून कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागत नाही, तर दुसरीकडे गुजरातमध्ये एका शेतकऱ्याने सरकारी कार्यालयातील अनास्थेमुळे आत्महत्या केली आहे. शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात पंचायत समितीत चकरा मारत होता. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही, हेलपाटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच फास लावून घेतला.

गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील ही ह्रदयद्रावक आणि सरकारी कार्यालयाची लख्तरे वेशीवर टांगणारी घटना आहे. येथील बांकोर गावचे शेतकरी बलवंत सिंह यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातच फाशी घेऊन आपला जीव दिला. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठी लिहिली होती. त्यामध्ये, आजही माझ्या अंतर्मनात बीजेपीच आहे, पण या गरीब शेतकऱ्याचं काम कुणीच केलं नाही, असे बलवंतसिंह यांनी लिहिलं आहे.

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनीही त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे, बलवंतसिंह यांनी टोकाचे पाऊल उचलले.

वडिलांचं घराचं स्वप्न पूर्ण न झाल्याचं सांगितलंआहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाव आलं होतं. परंतु, ग्रामपंयातीकडून काही आर्थिक मदत मिळाली नसल्याने, वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. असे बलवंतसिंह यांचा मुलगा राजेंद्र भाई यांनी सांगितलं आहे.