घनसावंगी : तालुक्यातील शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

घनसावंगी : पोलीसनामा ऑनलाइन – (जि.जालना) येथील शिंदेवडगावातील शेतकरी अशोक अंबादास येवले (वय ४०) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी (दि. ४) सकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार असून, त्यांच्या निधनाने कुटूंबाचा आधार गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक येवले हे गुरुवार (दि. ३) पासून घरातून निघून गेले होते. रात्री घरी न आल्याने कुटूंबीयांनी शुक्रवारी सकाळी त्यांचा शोध घेतला असता त्यांच्या शेतानजीकच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, राणीउंचेगाव येथे पाठवला.

परंतु, डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या कारणाने मृतदेह पुन्हा ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथे पाठवल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास डॉ. शिंदे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेहावर शिंदेंवडगाव येथे सहा वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर शेतकऱ्यास एक ते दीड एकर जमीन असून, अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने शेतीतून काही पिकले नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा खर्च तसेच बँकेचे व खासगी सावकारांचे कर्ज कसे फेडायचे ? या विवंचनेतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.