औरंगाबादेत उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू , दोन दिवसात दोघांचा बळी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील भेयगाव येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. ही घटना दि २८ मे रोजी रात्री उशिरा घडली उष्माघाताने मृत्यू झाल्याची गंगापूर तालुक्यातील ही दोन दिवसातली दुसरी घटना आहे.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, भोयगाव येथील सतिष कारभारी शिंदे (वय ४०) यांनी दिवसभर शेतात वखर मारत शेती मशागत केली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चारा छावणीत जनावरांना चारा दिला जातो, म्हणून तो बाबरगाव येथील चारा छावणीत जाऊन जनावरांना चारापाणी देउन पुन्हा उन्हातच ते घरी आले.

घरी आल्यानंतर संध्याकाळी सात वाजता त्यांना त्रास सुरु झाला. त्या नंतर त्‍यांना नातेवाईकांनी गंगापूर येथे दवाखान्यात दाखल केले, परंतु पुढील उपचारासाठी गंगापूरहून औरंगाबादला हलवल्यानंतर उपचारा दरम्यान रात्री अकरा वाजता सतिष शिंदे यांचा मृत्यू झाला . बुधवारी सकाळी शासकीय रूग्णालय औरंगाबाद येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्‍यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भाऊजाई, असा परिवार आहे.

गंगापूर तालुक्यात उष्माघाताचा दुसरा बळी

सध्या गंगापूर तालुक्यात ४२ अंशाच्यावर तापमान असून, या तापमानामुळे शरीराची लाही लाही होत आहे. या तापमानामुळे दि २६ रोजी तालुक्यातील जामगाव येथील तरुण शेतकरी बाळासाहेब आण्णासाहेब लाळगे याचेही दुपारी शेतामध्ये काम करत असताना चक्कर आल्याने दवाखान्यात दाखल केल्यानंतर निधन झाले होते. उष्माघाताचा गंगापूर तालुक्यात हा दुसरा बळी ठरला आहे.