कर्जमाफीपासून ‘वंचित’ राहिलेल्या शेतकर्‍याची मुख्यमंत्र्यांकडे ‘इच्छा मरणा’ची मागणी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – बँक ऑफ महाराष्ट्र च्या मुखेड शाखेत कर्मचारी वर्गाच्या मनमानी कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या वाकद येथील अशोक पिराजी वाळुंज व मंगल अशोक वाळुंज या नाराज दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाबाळांसह इच्छामरणाचा अर्ज सादर केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांनी निवेदन दिले.

शेतकरी वाळुंज यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. संबंधित कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचा संदेशही 1 एप्रिल 2018 रोजी प्राप्त झाला. मात्र मुखेड येथील महाराष्ट्र बँकेत चौकशीसाठी गेलो असता बँक व्यवस्थापकाने, तुमच्या कर्जमाफीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचे सांगत तुम्हाला कर्ज भरावेच लागेल असे सुनावले. मी वारंवार बँक शाखेला भेट दिली, मात्र प्रत्येक वेळेस मला बँकेकडून नकार मिळाला.

आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. पत्नीची 2016 साली हृदयाची शस्त्रक्रिया झाली. 2017 सालात तिला अर्धांगवायूचा आजार झाला. वेळोवेळी लागणारा औषधोपचाराचा खर्च व मुलीचे लग्न करणे आवश्यक आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च, दुष्काळ व अतिवृष्टी, नापिकीमुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. त्यामुळे आम्ही कर्ज भरु शकत नाही. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सन 2016 पासून जाहीर केलेली आहे.

आमचे कर्ज सन 2010 मधील असल्याने याही कर्जमाफी योजनेत आम्ही बसत नाही. त्यामुळे आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आमच्या पश्चात मुलांची परवड होवू नये म्हणून आम्हाला मुलाबाळांसह इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेला हरताळ
शेतकर्‍यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्ज देण्याची मोहीम हाती घेतली आहे, मात्र मुखेडच्या महाराष्ट्र बँक शाखेने या योजनेला हरताळ फासला आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकर्‍यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज चार टक्के दराने येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून शेती उपकरणे, औजारे, पशुपालक विनातारण 1 लाख 60 हजारांपर्यंत कर्ज, शेतकर्‍यांना क्षेत्रफळानुसार 1 ते 3 लाखापर्यंत कर्ज, 1 लाखाच्याआत उचल असल्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे.

ग्रामसभेत काळ्या यादीचा निषेध करणार
दहा वर्षांपासून सततचा दुष्काळ व अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांचे कर्ज थकीत झाले असले तरी त्यामुळे संपूर्ण कानळद व शिरवाडे या गावांना काळ्या यादीत टाकून पत असलेल्या खातेदारांनाही कर्ज नाकारले जाऊन वेठीस धरले जात आहे.त्यामुळे गावातील शेतकरी हतबल झाले आहेत.त्याच बरोबर हा या गावांचा अपमान आहे.महाराष्ट्र बँकेने ही गावे काळ्या यादीत म्हणजे कर्जबाजारी असल्याचे चित्र निर्माण केल्याने या गावातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे मुखेड महाराष्ट्र बँक शाखेविरोधात ही गावे ग्रामसभेत ठराव करणार असून त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना कळविण्यात येणार असल्याची माहिती कानळद सरपंच शांताराम जाधव,शिरवाडे सरपंच सुरेखा चिताळकर,माजी सरपंच शिवाजी सुपनर,संदीप आवारे यांनी दिली.

प्रतिक्रिया – बँक व्यवस्थापक,शशांक श्रीवास्तव
या संदर्भात बँक व्यवस्थापक शशांक श्रीवास्तव यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता बँकेमार्फत कर्ज मंजूर झाल्याचे संदेश बँकेने ज्यांचे खात्याशी भ्रमणध्वनी नंबर जोडलेले आहे अशा अगदी लहान खातेदार शाळकरी मुलांनाही पाठवले असल्याचे मोघम उत्तर दिले.शिरवाडे व कानळद ही गावे काळ्या यादीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांखाली वरिष्ठांनी टाकली असून याबाबत तुमची तक्रार लेखी दिल्यास मी वरिष्ठांना कळवतो असे सांगितले.बँकेवर खूप लोड झाला असून बँकेचा ५ कोटी एन.पी.ए झाला आहे त्यामुळे मी नवीन खातेदारांना कर्ज देऊ शकत नाही मात्र याच गावातील जुने व पत असलेल्या खातेदारांना कर्ज देऊ शकतो असे उत्तर दिले.अशोक वाळुंज यांच्या प्रकरणात सरकारी पोर्टलचा दोष असून त्यात बँकेचा कुठलाही दोष नसल्याचे सांगितले.

मी पी.एम.किसान योजनेचा लाभार्थी असून माझ्यावर कुठल्याही बँकेचे कर्ज नाही.विशेष पीककर्ज मोहिमेअंतर्गत पीककर्ज मंजूर झाल्याचा लघु संदेश आल्याने मी मुखेड महाराष्ट्र बँक शाखेशी संपर्क साधला असता शिरवाडे व कानळद ही गावे काळ्या यादीत असल्याने तुम्हाला पीककर्ज देता येणार नाही असे शाखा व्यवस्थापकाने सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like