दुर्देवी ! कोल्हापूर जिल्हयात ऊसाला लागलेली आग विझवताना शेतकर्‍याचा होरपळून जागीच मृत्यू

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – केखले ( ता. पन्हाळा ) येथे उसाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. हि घटना शनिवारी दुपारी घडली असून माणिक शामराव शिंगटे (वय ४२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, माणिक शिंगटे हे केखले येथील कुंभारकी नावाच्या वस्तीमध्ये राहतात. तेथूनच जवळ असलेल्या कारीदगी नावाच्या शेतातील उसाचा पाला पाचोळा पेटवत असताना शेजारी उभ्या असलेल्या ऊसाला आग लागेल म्हणून माणिक शिंगटे जवळच थाबले होते. परंतु, ऊनाची तीव्रता मोठया प्रमाणावर असल्याने अचानक शेजारी असलेल्या दिलीप पाटील यांच्या उसाला आग लागली. यावेळी आग विझविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आगीने रुद्र रूप धारण केल्याने त्यांनी फडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऊस आडवा तिडवा पडलेला असल्याने त्यांना जलदगतीने बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत जागीच होरपळून मृत्यू झाला.