कौतुकास्पद ! नाशिकच्या शेतकर्‍यानं मजुरांना वाटले गहू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – भारतामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला. यामध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद करण्यात आलं आहे.यामध्ये रोज काबाड कष्ट करून खाणाऱ्या मजुरांचे हाल होत आहे. त्याच वेळी अनेक मदतीचे हात ही समोर आले आहे.यात नाशिकचा एक तरुण शेतकरी मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

या शेतकऱ्याचे नाव दत्ता राम पाटील असून,गेल्या अनेक दिवसांपासून गावातील मजुरांच्या हाताला लॉक डाऊन मध्ये कामे नाही.अशावेळी दिवसाला कमविणाऱ्या या मजुरांनी घरखर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर सतावत आहे.तसेच हे मजूर दररोज दुसऱ्याच्या शेतावर काम करून पैसे कमवतात ,मात्र सध्या त्यांच्याकडे काही काम नसल्याने पैसे तर कोठून येणार घर कसे चालणार, काय खायचं हा मोठा प्रश्न होता.याच दरम्यान, काही मजुरांनी दत्ता पाटील यांच्याकडे मदत मागितली.यानंतर माणुसकीचे दर्शन घडवत पाटील यांनी आपल्या शेतातील ३ एकर गव्हापैकी १ एकर गहू या मजुरांमध्ये वाटला. यावर बोलताना दत्ता पाटील म्हणाले, मी एक साधा शेतकरी आहे. आर्थिकदृष्ट्या मी फार सक्षम नाही. मात्र माझ्याजवळ एक चपाती असेल तर त्यातील अर्धी मी गरजू व्यक्तींना देईल.