मुख्यमंत्र्यांच्या काकू भाजपवर ‘कडाडल्या’ ; पत्रकार परिषद घेऊन ‘या’ विभागावर केले गंभीर आरोप

चंद्रपूर : वृत्तसंस्था – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेसंदर्भात शोभाताई फडणवीस यांनी वनविभागाला लक्ष्य केले आहे. वृक्ष लागवड योजनेची चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातल्या सामान्य माणसावर वनविभाग बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप शोभाताई फडणवीस यांनी केला आहे. चंद्रपुरात पत्रकार परिषद घेऊन शोभाताई फडणवीस यांनी वनविभागावर आरोप केले आहेत.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकूंकडूनच केराची टोपली दाखवण्यात येत आहे. विदर्भात झाडं लावू नका तर मराठवाड्यात लावा, अशी भूमिका शोभाताई फडणवीस यांनी घेतली आहे. वृक्षारोपणासाठी वनविभागाने खोदलेले खड्डे बुजविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

औरंगाबाद विभागात वृक्षलागवडीची सर्वाधिक गरज..

औरंगाबाद विभागात सर्वाधिक कमी वनक्षेत्र आहे. तिथे वृक्षारोपणाची जास्त गरज आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातले सिंचन प्रकल्प वनकायदा आणि वनविभागामुळे रखडले आहेत. अशा प्रकल्पासाठी आवश्यक जमीन वनखाते देत नाही. मात्र, वनविभागाकडून वृक्ष लागवडीची जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप शोभाताईंनी केला आहे.

काय आहे ही वृक्षलावगडीची योजना

सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षलावगडीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. वृक्ष लागवडीत ग्रामपंचायतींना ८ कोटी तर इतर शासकीय विभागांना ६.२५ कोटी वृक्ष लावगड करण्याचे उद्दिष्ट आहे. ग्राम पंचायतींची ई-क्लास जमिनी अतिक्रमीत होऊन त्या ठिकाणी घरे तयार झाली आहे. परिणामी ग्रामपंचायतींना ८ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट कसे पूर्ण करावे हा प्रश्न निर्माण होणार आहे. अन्य विभागाने ६.२५ कोटी वृक्ष लागवड कोठे करावी, हा गंभीर प्रश्न आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि वनविकास महामंडळ असे १८.७५ कोटी वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. रेल्वे आणि वन विभागाकडे सर्वाधिक जागा असल्याने वन विभाग ७.२९ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट पार पाडले. मात्र, सामाजिक वनीकरणला शेतकऱ्यांच्या बांधावर ७.२९ कोटी वृक्षलागवड केल्याशिवाय पर्याय उरले.