सुशांत प्रकरणी राजू शेट्टींचं मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘ज्यानं गांजा घेतल्याचं बोललं जातंय त्याच्या आत्महत्येची चर्चा !’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – ज्यानं गांजा घेतल्याचं म्हटलं जातं त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची जोरदार चर्चा, परंतु दुधाला भाव मिळाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळे यांच्या आत्महत्येबद्दल साधी चर्चा नाही असं म्हणत राजू शेट्टी यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे.

आज (शनिवार दि 29 ऑगस्ट) राजू शेट्टी नाशिकमध्ये आहेत. राजू शेट्टी म्हणाले, “दुधाला दरवाढ मिळावी यासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. मात्र त्याबाबत गुन्हा दाखल होत आहे. तो होऊ द्या. आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे. आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत. आणखी एका गुन्ह्याची भर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करणारच” असा इशाराही त्यांनी दिला. राजू शेट्टी पुढं म्हणाले, “सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत. ही लूट थांबली पाहिजे. सरकारनं 6 एप्रिल पूर्वी दूध संघाचं संकलन आणि नंतरचं संकलन याचं ऑडिट करावं. उत्पादकांच्या नावार सरकारनं दूध केंद्रांवर डल्ला मारलाय” असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

भाजपाला लगावला टोला
राजू शेट्टी यांनी यावेळी भाजपाला टोला लगावला. ते म्हणाले, “मंदिर, मशिदीसाठी आंदोलन करण्यापेक्षा भक्तांच्या समस्यांसाठी आंदोलन करा. देवाची पूजा करणारा शेतकरी आज संकटात सापडला आहे. देऊळ, मंदिर, मशिद उघडणं महत्त्वाचं नाही” असंही ते म्हणाले.