कृषी कायद्यावरुन NDA ला दुसरा धक्का, PM मोदींनी आणखी एक मित्रपक्ष गमावला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास (Farmer Protest) आता जवळपास महिना झाला आहे. अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याने, आता हे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. शिवाय, शेतकरी संघटना देखील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. दुसरीकडे, केंद्र सरकारकडून हे आंदोलन थांबावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आणखी एका मित्र पक्षाने एनडीएची (NDA) साथ सोडली आहे.

 

राष्ट्रीय लोकशाही पार्टी (RLP) पक्षाने  आज एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. तर कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी या आगोदर अकाली दलने देखील भाजपची साथ सोडली आहे. आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल म्हणाले की, मी आज एनडीए सोडत असल्याची घोषणा करतो. तीन कृषी कायद्यांविरोधात मी रालोआची साथ सोडली आहे. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. जरी मी रालोआ सोडले असले तरी मी काँग्रेसला साथ देणार नसल्याचे बेनीवाल यांनी सांगितले.

मोदींकडे 303 खासदार आहेत, त्यामुळेच ते कोणाला न जुमाना कृषी कायदे मागे घेत नाही. 1200 किमी लांबहून राजस्थानचे शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. हरियाणाच्या सीमेवरील शाहजहांपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर आम्ही एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे हनुमान बेनीवाल यांनी सांगितले. बेनिवाल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष 26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांना घेऊन राजस्थानहून दिल्लीला जाण्यासाठी कूच करेल. तेव्हाच एनडीएमध्ये रहायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले होते. ते जाटांचे नेते असून नागौरचे खासदार आहेत.