भारत बंद : आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांनी मंगळवारी (उद्या, दि. 8 डिसेंबर) भारत बंद पुकारला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनंही शेतकर्‍यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केलाय. त्याचबरोबर जनतेनं बंद पाळण्याचंही आवाहन केलंय. शिवसेनेनं जाहीर केलेल्या भूमिकेवरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी जुन्या भूमिकेची आठवण करून देत शिवसेनेवर टीका केलीय.

आता ‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा!, असा उपहासात्मक टोलाही आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय. शेतकर्‍यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेना पक्षावर निशाणा साधलाय.

यावेळी आशिष शेलार म्हणाले,दिल्लीमध्ये लोकसभेत शिवसेनेचा सीएए व कृषी विधेयकाला पाठिंबा तसेच राज्यसभेत विरोध महाराष्ट्रात प्रथम समृद्धी महामार्गाला विरोध आता श्रेयासाठी पाहणी दौरे सुरु… मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रो बाबतही अशाच आप-मतलबी भूमिका दिल्ली ते गल्ली दल बदलू कार्यक्रम सुरुच आहेत!, अशी टीका आशिष शेलार यांनी केलीय.

हिंदुत्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणार्‍यांनी आता ‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा!, असा सल्ला देगील आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.

नुकतीच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केलीय. करोना काळात आंदोलने आवरा! आता ‘भारत बंद’मध्ये जनतेने सहभागी व्हावे,असे तुम्हीच सांगताय? अन्नदात्याला सगळ्यांचीच सदैव सहानुभूती आहे. दुर्दैवाने शेतकर्‍यांच्या नावाने दल-बदलू राजकारण करणार्‍यांनाच खरी कर्माची फळे भोगावी लागतील!, असा सूचक इशाराही आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.

…काही पक्षांना स्मृतीभ्रंश झालाय
या राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 48 वर्ष दोन महिने सरकार होतं. देशामध्ये 52 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचं सरकार होतं. ज्याला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणायचो. मग, त्या कृषी क्षेत्रात असं काय झालं? का व्याख्या बदलली? याचं कधी चिंतन केलं का? आज काही राजकीय पक्ष मी नेत्यांबद्दल बोलत नाही. त्यांना राजकीय विस्मरणाचा आजार झालाय. त्याला आपण ‘पॉलिटिकल अल्झायमर’ हा शब्द वापरू शकतो, असं म्हणत मुनगंटीवार यांनीही शिवसेना पक्षावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलाय.