वॉटर कॅनन, आश्रुधुराने सुद्धा थांबली नाहीत शेतकर्‍यांची पावले, दिल्लीच्या जवळ पोहचले

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली चलो मार्च अंतर्गत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत आणि दिल्लीत येण्यासाठी ते सर्व अडथळ्यांना तोंड देत आहेत. पंजाबपासून हरियाणाच्या रस्त्यांवर शेतकर्‍यांचा हल्लाबोल गुरूवारी सुरू झाला तो अजूनही सुरूच आहे. शेतकरी दिल्लीत येण्यासाठी अडून बसले आहेत आणि पोलिसांशी झालेल्या झटापटीनंतरही ते मागे हटण्यास तयार नाहीत. गुरुवारी शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक ठिकाणी झटापट झाली. शेतकर्‍यांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीसबळाचा वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना पुढे जाऊ न देण्यासाठी वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर पोलीस करत आहेत, मोठ-मोठे दगड टाकून रस्ते बंद केले आहेत.

मात्र, हे सर्व अडथळे पार करत शेतकरी पुढे सरकत आहेत. आता शेतकरी दिल्लीच्या जवळ पोहचले आहेत आणि कोणत्याही वेळी राजधानीमध्ये प्रवेश करू शकतात, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी सुद्धा तयारी केली आहे.

पोलिसांनी पूर्ण ताकद लावली
या आंदोलनात सहभागी झालेले पंजाब आणि हरियाणाचे अनेक शेतकरी सायंकाळी उशिरापर्यंत राजधानीत पोहोचले. शहर पोलिसांनी सिंघू सीमेवर वाहतूक रोखली आहे. गुरुवारी संध्याकाळी बहादूरगडहून दिल्लीकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात आली. आंदोलकांसह येणारे ट्रॅक्टर थांबविण्यासाठी सिंघू सीमेवर पाच वाळूने भरलेले ट्रक आणि तीन वॉटर कॅनन्स तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कायदा व सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनही तैनात करण्यात आले आहेत. सिंघू सीमेवर अडथळ्यांसह काटेरी तारांची कुंपण बांधली गेली आहेत, जेणेकरून निदर्शकांना पुढे येता येणार नाही.

पोलिस बंदोबस्त तैनात
शेतकर्‍यांनी दिल्लीत जाऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी एनएच -24, चिल्ला सीमा, तिगरी सीमा, बहादुरगड सीमा, फरीदाबाद सीमा, कालिंदी कुंज सीमा आणि सिंघू सीमा येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पंजाब आणि हरियाणा येथून येणारे शेतकरी सिंघू सीमेवरुन दिल्लीत येण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव म्हणाले की, आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही.

मेट्रो सेवेवर परिणाम
निदर्शनांमुळे दिल्ली ते एनसीआरच्या इतर शहरांतील मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत, तर शेजारच्या शहरांमधून दिल्लीला जाणारी मेट्रो सेवा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी काल जंतर-मंतर येथे शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या एका गटाच्या सुमारे 70 जणांना ताब्यात घेतले. निदर्शकांमध्ये डाव्या कामगार संघटनेचे सदस्य, एसएफआयचे सदस्य आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, महिलांसह 70 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना सोडण्यात आले. शेतकर्‍यांच्या हालचाली पाहून पोलिसांनी हरियाणाच्या सोनीपत-पानिपत हल्दाना सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दगड टाकून पोलिसांनी बॅरिकेडिंग लावली आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना रोखण्यासाठी पोलिसांनी रस्ता खोदला आहे. काल पोलिस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या झटापटीमुळे कित्येक किलोमीटर लांब वाहतुक ठप्प झाली होती.

वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर
हरियाणा पोलिसांनी गुरुवारी पंजाबमधील शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला आणि अश्रुधुराचा वापर केला. केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात प्रस्तावित ‘दिल्ली चलो मार्च’ अंतर्गत बॅरिकेड्स ओलांडून हे शेतकरी हरियाणामध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. संध्याकाळी उशीरा एक मोठा गट दिल्लीपासून 100 कि.मी. अंतरावर असलेल्या पानिपत येथील टोल प्लाझावर पोहोचला होता. भारतीय किसान युनियन (हरियाणा) नेते गुरनाम सिंह म्हणाले की, निदर्शक रात्र येथे काढणार आहेत आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा मोर्चाला सुरुवात होईल.

पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष
पंजाबच्या शंभू आंतरराज्य सीमेजवळ घागर नदीच्या पूलावरील ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये हरियाणा पोलिस आणि पंजाबच्या आंदोलकांमध्ये चकमक उडाली. हरियाणा पोलिस अधिकार्‍यांनी ’लाऊड स्पीकर’ वापरुन पंजाब सीमेजवळ जमलेल्या शेतकर्‍यांना तेथून दूर जाण्यास सांगितले. त्यातील काही लोक बॅरिकेड्सवरून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी, अश्रुधुर सोडण्यात आला. हरियाणाच्या सिरसा, कुरुक्षेत्र, फतेहाबाद आणि जींद जिल्ह्यात पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक झाली.

हरियाणा पोलिसांनी अमृतसर-दिल्ली महामार्गावरील सीमेजवळ ट्रकचा रस्ता रोखला आणि शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर-ट्रॉली थांबविण्यासाठी अडथळे लावले. यातील काही ट्रॅक्टर ट्रॉली दोन दिवसांच्या आंदोलनासाठी अन्नधान्यांनी भरलेल्या आहेत. परंतु काही तासांनंतर अनेक सीमावर्ती चौक्यांमधून शेतकर्‍यांना सोडण्यात आले. शंभू आंतरराज्यीय सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावरील परिस्थिती तणावपूर्ण होती, तेथे शेतकर्‍यांनी घग्गर नदीत काही बॅरिकेड्स टाकले. त्यातील काहीजण ट्रकला धक्का देतानाही दिसले.

योगेंद्र यादव यांना अटक
गुडगावमध्ये स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव आणि निदर्शकांच्या एका गटाला पोलिसांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करताच ताब्यात घेतले. मात्र नंतर त्यांना सोडले. दिल्लीच्या सीमेवरील उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे निदर्शने झाल्याने गुडगाव हद्दीजवळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गुरुवारी, हरियाणाने पंजाबलगतच्या सर्व सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत, जेणेकरून दिल्लीला जाणारे शेतकरी त्यांच्या हद्दीत जाऊ शकणार नाहीत.

You might also like