शेतकर्‍यांनी धुडकावला चर्चेचा प्रस्ताव, दिल्ली जाम करण्याचा दिला इशारा, नड्डा यांच्या घरी मध्यरात्री मोठी बैठक

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी आता दिल्ली ब्लॉक करण्याची घोषणा केली आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात मागील चार दिवसांपासून निदर्शने करत असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनकर्त्यांनी उत्तर दिल्लीच्या बुराडी येथील मैदानात गेल्यानंतरच चर्चा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणतीही सशर्त चर्चा मान्य नाही.

त्यांनी इशारा दिला की, ते राष्ट्रीय राजधानीत येणारे सर्व पाच प्रवेश मार्ग बंद करतील. रविवारपर्यंत केवळ सिंघु बॉर्डर आणि टिकरी बॉर्डर ब्लॉक होती, परंतु आता गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरीदाबादहून राजधानीला जोडणारे हायवे शेतकरी ब्लॉक करतील. शेतकर्‍यांनी आंदोलनासाठी बुराडीला जाण्यास नकार दिल्यानंतर रात्री उशीरा भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी उच्चस्तरीय बैठक झाली, जी सुमोर 2 तास सुरू होती.

अमित शाह यांचा प्रस्ताव मंजूर नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी संघटनांना आश्वासन दिले की, मंत्र्यांचे एक उच्चस्तरीय पथक आंदोलनकर्ते बुराडी येथे पोहचल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करेल. शेतकर्‍यांच्या 30 पेक्षा जास्त संघटनांच्या रविवारी झालेल्या बैठकीत बुराडी मैदानात पोहचल्यानंतर तीन डिसेंबर अगोदर चर्चेच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्तावर चर्चा करण्यात आली, परंतु हजारो आंदोलनकर्त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि थंडीत आणखी एक रात्र सिंघु तसेच टिकरी बॉर्डरवर काढण्याचे ठरवले.

शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, त्यांना शाह यांची ही अट मान्य नाही की, त्यांनी आंदोलनाचे ठिकाण बदलावे. त्यांनी दावा केला की, बुराडी मैदान एक खुले जेल आहे. विरोधी पक्षांनी सुद्धा गोष्टींवर जोर दिला की, सरकारने शेतकर्‍यांशी अटींशिवाय चर्चा केली पाहिजे.

भारतीय किसान युनियन (भाकियू) च्या पंजाब युनिटचे अध्यक्ष सुरजीत एस फूल यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अट आम्हाला मान्य नाही. आम्ही कोणतीही सशर्त चर्चा करणार नाही. आम्ही सरकारचा प्रस्ताव अमान्य करत आहोत. घेराव संपणार नाही. आम्ही दिल्लीत प्रवेश करण्याचे पाचही मार्ग बंद कराणार. चर्चेसाठी अट शेतकर्‍यांचा अपमान आहे. आम्ही बुराडीला जाणार नाही. ते पार्क नाही तर खुले जेल आहे.

निरंकारी समागम मैदानात आंदोलन
शनिवारी बुराडीमध्ये निरंकारी समागम मैदानात पोहचलेल्या शेतकर्‍यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.

आज पुन्हा नव्याने चर्चेची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलन लवकर संपवण्यासाठी सरकार सोमवारी पुन्हा नव्याने चर्चा करू शकते. सरकार आंदोलनकर्त्यांशी विनाअट चर्चेसाठी तयार आहे. त्यांचा प्रयत्न आहे की, शेतकरी आंदोलन शक्य तेवढ्या लवकर हायवेवरून दूर केले जावे, जेणेकरू वाहतूक सुरळीत होईल. सोमवारी दिल्ली आणि जवळपासचे विवाह सोहळे पाहता अनेक अडचणी वाढू शकतात. या दरम्यान समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी कायदा सुव्यवस्था कडेकोट केली जात आहे.

You might also like