‘RSS चे ते कृत्य राष्ट्रपती विसरलेत का ?’, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या काही शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावला. या घटनेवरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणातून नाराजी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिन आणि तिरंग्याच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं होतं. राष्ट्रपतींच्या या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून ज्या RSSने आपल्याला राष्ट्रपती बनवलं आहे, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावं लागलं होतं, असं म्हणत राष्ट्रपतींना प्रश्न विचारला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या घडलेल्या घटनेवरून जो संशयकल्लोळ निर्माण केला जात आहे, त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपती कोविंद यांना इतिहासाचा दाखल देत RSSने सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. आदरणीय राष्ट्रपती महोदय, प्रचंड दुःख आणि खेदाने आपल्याला याची आठवण करून देणं आवश्यक आहे की, ज्या RSSने आपल्याला राष्ट्रपती बनवलं आहे, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावं लागलं होतं की, ते तिरंग्याचा अपमान करणार नाही आणि २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवू.

RSSने तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर RSSने १५ ऑगस्ट १९४७ साली काळा दिवस साजरा केला होता. त्यांची निंदा, निषेध का करत नाही करत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे केलेल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करताना, या कायद्यांमुळे लहान शेतकऱ्यांना लाभ मिळू लागल्याचे म्हटलं होतं. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचाराचा आणि राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा ‘अतिशय दुर्देवी’ अशा शब्दांत त्यांनी निषेध केला होता. जर संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असेल तर त्याचा वापर कायदा आणि नियम पाळून गांभीर्याने करणे अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले होते.