..म्हणून ‘त्या’ शेतकर्‍याचा भूमी अभिलेख कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाइन – भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक काडगावकर यांनी बानावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची परस्पर विक्री केल्याचा आरोप करत एका शेतक-याने भुमी अभिलेख कार्यालायात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहोळ तालुक्यातील बिटले गावचे नामदेव खताळ असे या शेतक-याचे नाव असून त्यांनी काडगावकर यांच्यावर गंभीर आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार आज (शुक्रवार) दुपारी साडेबाराच्या सुमरास घडला. या घटनेमुळे भुमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.

नामदेव खताळ यांच्या जमिनीचा खटला मोहोळ न्यायालयात सुरु होता. न्यायालयाने खताळ यांच्या विरोधात निकाल दिला. न्यायालयाने सरुबाई थोरबोले यांच्या बाजूने निकाल दिला. हा निकाल देताना त्यांचे वकिल आणि न्यायाधीश यांच्याशी संगनमत करुन आपल्या विरोधात निकाल दिल्याचा आरोप खताळ यांनी केला आहे. आज दुपारी खताळ हे भूमी अभिलेख कार्य़ालयात आले होते. त्यांनी कार्यालयाच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून खताळ यांचा गळफास सोडवला. पोलिसांनी खताळ यांना ताब्यात घेतले आहे.

उपअधीक्षक काडगावकर आणि मोजणीदार राऊत या दोघांनी वकिलांशी संगनमत करून जिल्हाअधीका-यांच्या खोट्या कागदपत्राच्या आधारे दिशाभूल केल्याचा आरोप खताळ यांनी केला. तसेच काडगावकर आणि राऊत यांनी आपल्या जमिनीची परस्पर विक्री केली आहे. जर मला न्याय मिळाल नाही तर सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, खताळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.