Osmanabad News : धक्कादायक ! पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून उमरगा तालुक्यातील शेतकर्‍याची आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उमरगा तालुक्यातील बोरी येथील प्रेमनाथ किसन मदने या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील विहिरीच्या काटेवर असलेल्या चिंचेच्या झाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.८) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी प्रेमनाथ पोलीस ठाण्यात चौकशीला गेले असता, पोलिसांनी मारहाण केली त्यानंतरच प्रेमनाथने आत्महत्या केल्याचा आरोप मेहुणा संभाजी खांडेकर यांनी केला.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, ५ जानेवारीला प्रेमनाथ व चुलत बंधू खंडू मदने हे दोघे दुचाकीवरुन निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथे गेले होते. प्रेमनाथ हा त्याच दिवशी गावाकडे आला. दुसऱ्याचा दिवशी (६ जानेवारी) खंडूचा मृतदेह लिंबाळा शिवारात आढळून आल्यावर कासारशिरसी पोलिसांनी चौकशी करुन मृतदेहाची ओळख पटवली. याप्रकरणी चौकशी केली असता खंडूचा बंधू पंडित मदने यांनी खंडू हा प्रेमनाथ सोबत गेल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बोरीचे पोलीस पाटील बालक मदने, माजी सरपंच गणेश नटवे यांना फोन करुन प्रेमनाथला चौकशीसाठी घेऊन येण्यास सांगितले.

त्यानुसार प्रेमनाथ गुरुवारी (दि. ७) चौकशीला गेला. त्याच्यासोबत त्यांचा मेहुणा संभाजी खांडेकर होता. पोलिसांनी खंडू मदने मृत्यूप्रकरणी चौकशी केली. तथापि, पोलिसांनी प्रेमनाथला शुक्रवारी (दि. ८) पुन्हा चौकशीसाठी येण्यास सांगितले. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नीस प्रात:विधीसाठी जातो असे सांगून तो शेतात गेला आणि स्वतःच्या विहिरीच्या काटेवर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रेमनाथचा संबंध नसताना पोलिसांनी गुन्हा कबूल कर…अन्यथा उद्या तुला यापेक्षा अधिक मारहाण करु असे म्हणत कातडी पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच भीतीने प्रेमनाथने आत्महत्या केली असून, याप्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्याची तक्रार संभाजी खांडेकर यांनी निलंगा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे केली.