चाराछावणी बंद केल्याने दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर तालुक्यातील खांडके येथील दिव्यांग शेतकऱ्याने
कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. लक्ष्मण संपत गाडे (वय 35) हे मयताचे नाव आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा व शासनाने सुरु केलेली छावणी बंद केल्याने शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी आज दुपारी नगर पाथर्डी रस्त्यावरील कवडगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाळा सुरू होवून दोन महिन्यानंतरही पाऊस न झाल्याने नगर तालुक्यात दुष्काळच आहे. शेतात पीक नाही, जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, अशा परिस्थितीत शासनाकडून सुरू असलेल्या चारा छावण्या व पाण्याचे टँकर बंद केले. खांडके येथील लक्ष्मण संपत गाडे या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. चारा छावण्या व पाण्याचे टँकर प्रशासनाने बंद केल्याने निराश होऊन लक्ष्मण गाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप उपसरपंच चेटे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.

लक्ष्मण गाडे यांच्या पश्‍चात आई- वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. प्रशासनाच्या या धाकटशाही विरोधात ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार व सोमवारी जिल्ह्यात येत आहे. त्यावेळी मुख्यंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.