हिंगोली : आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.10) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना हिंगोली तालुक्यातील डिग्रस कोऱ्हाळे येथून जवळच असलेल्या सिद्धी गणपती मंदिराजवळील हिवरा जटु शिवारा सकळी उघडकीस आली. सुभाष संभाजी भोजे (वय-50 रा. सुकळी. ता. हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून सुभाष भोजे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सुकळी येथील रहिवाशी असलेले सुभाष भोजे यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या कळमनुरी शाखेचे दोन लाखांचे कर्ज आहे. तसेच वाहन कर्जावर घेतले आहे. याचे हप्ते कसे फेडायचे या चिंतेत सुभाष होते. याच आर्थिक संकटातून त्यांनी हिंगोली-औंढा रोडवर एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती रामा भोजे यांनी हिंगोली पोलिसांना दिली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. तायडे व बीट मार्शल सुभाष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.