राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे शरद पवारांचं पाप : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला :  पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचं घमासान सुरु झाले आहे कारण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. 15 वर्षं तुमचं सरकार होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते अकोल्यातल्या अकोटमध्ये महाजनादेश संकल्प यात्रेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, विदर्भाच्या हिश्श्याचा पैसा भ्रष्टाचारामध्ये तुम्ही पळवला. तुम्ही हा पैसा तुमच्या तिजोरीत नेला.

शेतकरी आत्महत्यांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट शरद पवारांवर आरोप केले आहेत यात ते म्हणाले, पवारसाहेब विदर्भामध्ये फिरतायत. शेतकरी आत्महत्या होतायत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या राज्यामध्ये सुरू झाल्या, शेतकरी आत्महत्या हे पाप तुमचं आहे, कारण या शेतकऱ्याच्या शेतीला तुम्ही पाणी पोहोचू दिलं नाही. तुमचे या ठिकाणी मंत्री होते, तुम्ही केंद्रात कृषिमंत्री होतात अशा प्रकारचा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना विचारला आहेत.

राहुल गांधींवर साधला निशाणा
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले राहुल गांधींना कळून चुकले आहे की इथे सभा घेऊन काही उपयोग नाही म्हणून तर बँकॉकला फिरायला गेले आहेत. शेवटी वरिष्ठानी विनवी केल्यानंतर महाराष्ट्रात एक दोन सभा घेणार आहेत असं म्हणताहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी सध्या मरगळलेल्या काँग्रेसला लगावला आहे.

शरद पवारांना सुनावले खडे बोल
मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रवादीची हालत अशी आहे की त्यांच्यासोबत रहायला सध्या कोणी तयार नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून एवढंच सांगायचं बाकी राहिलं आहे की, पुन्हा निवडून दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला ताजमहाल आणि चंद्रावर एक प्लॉट देऊ, कारण त्यांना माहीत आहे, की महाराष्ट्रात 15 ते 20 वर्षं सत्ता येत नाही अशा प्रकारचा घणाघात मुख्यमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रवादीवर केला आहे.

सरकारच्या कामाचं केलं कौतुक
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने काय काय काम केलं याचा पाढाच वाचला यामध्ये ते म्हणाले खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी मोदीजींचे सरकार उभे राहिले आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये दुष्काळमुक्तीचा संकल्प आपण केला आहे.

बुलडाणा, अकोला जिल्ह्यात सिंचन प्रकल्प करतोच आहोत. त्याच बरोबर गोसीखुर्दच्या खालून जे शेकडो टीएमसी पाणी वाहून जाते. ते 480 किमीचे टनेल तयार करून 100 पेक्षा जास्त टीएमसी पाणी आपण बुलडाण्यापर्यंत आणतो आहोत.बुलडाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.
वाहुन जाणारे पाणी आले तर विदर्भ सुजलाम सुफलाम होणार आहे.

गेल्या सरकारने कधीच एवढा निधी विदर्भासाठी दिला नव्हता इतका निधी भाजप सरकारने विदर्भाला दिला आहे. त्यामुळे पाच वर्षाचा मुलगा देखील सांगेल की कोणाचं सरकार येणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com