धुळे : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्रकाश हिलाल पाटील (रा. दसवेल, ता. शिंदखेडा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम कोलमडला. त्यातच सततच्या नापिकीमुळे कर्जाचा बोजा वाढला. हे कर्ज कसे फेडावे या विचारत असलेले पाटील यांनी आत्महत्या करत जीवन संपवले. पाटील हे गत काही दिवसांपासून कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. सलग 3 वर्ष कोरडा दुष्काळ आणि या वर्षी अतिवृष्टी या मुळे बँकेचे कर्ज फिटले नाही. त्यांच्यावर एसबीआय बँकेचे 3 लाख कर्ज आहे. हंगामासाठी नातलागांकडून हात उसनवारीवर घेतलेले पैसे पण फिटत नाहीत याची चिंता होती. आता जाहीर झालेल्या कर्ज माफीचा पण लाभ मिळणार नाही. आता कर्ज कसे फिटेल याचा विचार सतत पाटील यांच्या मनात घोळत होता. याच विचारात त्यांनी होळ गावाजवळील रेल्वेरुळावर धावत्या रेल्वेच्या खाली उडी घेत आत्महत्या केली.

गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने त्यांना नरढाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या संदर्भात नरढाणा पोलीस ठाण्यात अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, 2 भाऊ, सूना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.