राजू शेट्टी यांची ठाकरे सरकारविरोधात भूमिका; म्हणाले – ‘सत्तेपेक्षा शेतकरी महत्त्वाचा’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य शासनाला धारेवर धरले आहे. तर महाविकास आघाडीचा हा घटक पक्ष असून देखील सरकार विरोधात शेट्टी यांनी भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली असल्याने संघटनेच्या भूमिकेविषयी चर्चेला उधाण आलं आहे.

महाविकास आघाडी सरकार सोबत घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील असून आता सरकारच्या अर्थसंकल्पावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. लॉकडाऊन मधील वीज बिल माफ करावे यासाठी सरकार विरोधात भूमिका घेत आहेत. वीज कनेक्शन कट केल्यास हात कलम करण्याची भाषा वापरत आहेत. कर्जमाफीच्या धोरणाबाबतही ते सरकारवर टीका करत आहेत. सत्तेत असून सरकारच्या अनेक धोरणांवर ते टीका करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला अडचणीत आणण्याची भूमिका आहे असे दिसून येत आहे.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणतात, सत्तेपेक्षा आम्हाला शेतकरी आणि सर्वसामान्य जनता महत्त्वाची आहे. ज्यांच्यासाठी आम्ही सत्तेत गेलो, त्यांचेच प्रश्न सुटत नसतील तर आम्ही शासनाच्या विरोधात बोलणार. राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता प्रसंगी यापुढे अधिक आक्रमक भूमिका घेऊ असे ते म्हणाले आहे. दरम्यान, शेतकरी संघटना आघाडी सरकारवर अनेक कारणामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. तर आघाडी सरकारने जे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये राजू शेट्टी यांचे नाव आहे. मात्र ही प्रक्रिया राज्यपालाकडून रखडली आहे. या सर्व घटनेवरून मागील काही दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. तसेच ऊसाला एकरकमी एफआरपी देताना तुकडे पाडू नका, या मागणीसाठी संघटना आंदोलन केले हे आंदोलन मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर केले आहे. सत्तेत असून देखील सरकार विरोधी आंदोलन करण्याने संघटने विषयी अनेक चर्चा निर्माण होत आहेत.