शेतकऱ्याची मुलगी बनली वैद्यकीय अधिकारी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील शेतकरी सूर्यकांत कराड यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण देऊन तिला वैद्यकीय अधिकारी बनवले. या यशामुळे सर्वत्र आई- वडिलांसह मुलीचेही कौतुक होत आहे. चिखली येथील सूर्यकांत कराड हे शेतकरी असून त्यांना २५ गुंठे जमीन आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व मुलाच्या शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने मिळेल त्या वाहनावर चालक म्हणून काम करून मुलांचे शिक्षण पूर्ण करीत आहेत. त्यांना दोन मुले आणि दोन मुली असून एक मुलगा बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सैनिक दलात दाखल झाला आहे. तर दुसरा मुलगा नववी या वर्गात लातूर येथे शिकत आहे. त्यांची सर्वात मोठी मुलगी सध्या एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय अधिकारी बनली आहे.

तर दुसरी मुलगी नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून वैद्यकीय परीक्षेची तयारी करत आहे. डॉ. वर्षा कराड यांनी प्राथमिक शिक्षण चिखली, माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय परभणी व बारावीचे शिक्षण वाशीम तर एमबीबीएसचे शिक्षण नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. सध्या रेणापूर तालुक्यातील बिटरगाव येथील वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. या यशाचे श्रेय मामा माधवराव मुंढे व चुलते लक्ष्मण कराड यांना दिले आहे. यांनी आर्थिक मदतीबरोबर शैक्षणिक मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल ना. पंकजाताई मुंडे खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. विनायकराव पाटील, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, रमेश कराड लातूर, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे, डॉ. उज्ज्वला कराड – दहिफळे औरंगाबाद, वैद्यकीय डॉ. अधीक्षक बाळासाहेब नागरगोजे अहमदपूर, डॉ. राम मुंडे लातूर, भारत सरकार रेल्वे बोर्ड सदस्य धनराज गुट्टे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.