स्पर्धा परिक्षेसाठी पुस्तकं मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा आॅनलाइन – स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके घेण्यास पैसे नसल्याने निराश झालेल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळामुळे वडीलांची आर्थिकस्थिती अतिशय बिकट झाल्याने मुलीस शिक्षण देणेही त्यांना कठीण होऊन बसले होत. वडीलांची होणारी ही घुसमट मुलीला सहन न झाल्याने तीने मृत्यूला कवटाळल्याच्या या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळही व्यक्त होत आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शिराढोण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून मृताच्या कुटुंबीयास आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

पिंपरी (शि.) येथील अविनाश राऊत (४५) यांना एक एकर शेती असून शेतातच हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. राऊत यांची मुलगी प्रगती (२२) ही मुरुड (जि. लातूर) येथील संभाजी महाविद्यालयात वाणिज्य तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होती. तिची स्पर्धा परीक्षेस बसण्याची इच्छा होती. या परीक्षेसाठीची आवश्यक पुस्तके, शिकवणीसाठी तिने वडिलांकडे पैशाची मागणी केली होती. राऊत यांनी शेतीवरही कर्ज काढले होते. शिक्षणासाठी कळंब येथील फायनान्समधून कर्ज काढून पैसे देण्याचे आश्वासन राऊत यांनी मुलीस दिले होते. सकाळी राऊत हे पत्नीसह फायनान्समधून कर्जाची रक्कम आणण्यासाठी कळंबला गेले होते.

दरम्यान, ६० हजारांचे कर्ज घेऊन सायंकाळी ते घरी परतले. बराच वेळ हाक मारूनही दरवाजा न उघडल्यामुळे राऊत यांनी लाथ मारून दार उघडले. यावेळी प्रगतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती समजताच शिराढोण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर शिराढोण येथील ग्रामीण रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. कळंब तालुक्यातील पिंपरी (शि.) येथील या घटनेप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शरद पवार उद्यापासून २ दिवस कोल्हापुरात, दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष