‘कोरोना’बरोबर अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हताश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- कोरोना व्हायरसचा संसर्ग भयानक असतानाच अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्व हवेलीमध्ये शेकडो एकर गहू काढणीस आला आहे. मात्र अवकाळी पावसामुळे उभे पिक भुईसपाट झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हताश झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे गव्हाचे पिक काढण्यासाठी मजूर मिळत नाही आणि अवकाळी पावसाने दोन दिवसांपासून कहर केल्याने बळीराजाला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.

मागिल तीन दिवसांपासून सकाळी कडाक्याचे उन आणि दुपारनंतर अचानक आकाशामध्ये ढगांचा कडकडाट आणि विजांचा लखलखाट होत मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे. सलग तीन चार तास एकसारखा सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे गहू पेरणीला उशीर झाला होता, त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी गव्हाच्या पेरणी घट झाली होती. त्यातच ज्या शेतकऱ्यांना शेत तयार करुन गव्हाचे पिक जोमात आणले आहे. गव्हाची काढणी करण्याची तयारी करत असतानाच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मजूरही काम करण्यासाठी येत नाही. गावबंदीमुळे जुन्या पध्दतीचे ट्रक्टरवरील गहू मळणी मशीनदेखील मिळत नाही, अशा भयानक अवस्थेत शेतकरी सापडला आहे.

आता गहू काढणीसाठी हार्वेस्टर मशीनची वाट शेतकरी पाहतो आहे. मात्र, पावसामुळे चिखल झालेला आहे. पावसामुळे उभ्या पिकाचे नुकसान हताशपणे पाहणे एवढेच बळीराजाच्या हातात राहिले आहे. अवकाळीमुळे शेतीतील कामाचा खोळंबा झाला असून, शेतकऱ्यांच्या अडचणी सुटण्याऐवजी त्यामध्ये भरच पडत आहे.

शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे
शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. आता दुधाला 10 रुपये लिटरमागे तोटा सहन करावा लागत आहे. बँकांकडून कर्ज काढून लाखो रुपयांच्या गायी खरेदी करायच्या, त्यांच्यासाठी मोलामहागाईचे भुसार माल, चारा आणल जात आहे. मात्र, आता दुधाला भाव मिळत नसल्याने बँकांचे कर्ज तरी कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्याचबरोबर जर्सी गायींना दररोजचे औषधपाणी आणि डॉक्टरांचा खर्च आहे. त्यामध्ये कुठे सवलती मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. आता शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.