दर गडगडल्याने टोमॅटो उत्पादक ‘निराश’, टोमॅटोचे ‘प्लॉट’ टाकले काढून

देवराष्ट्रे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतमालाला बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. गेल्या महिन्यापासून टोमॅटोचे दर सातत्याने गडगडत आहेत. १८ ते २२ रुपये दराने टोमॅटोची खरेदी सुरू होती. मात्र आता हेच दर २ ते ४ रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. उत्पादक शेतकरी निराश झाला आहे. या भावातून टोमॅटो शेतातून तोडून बाजारात पाठवणे परवडत नाही. काही शेतकऱयांनी नुकतेच सुरू झालेले टोमॅटोचे प्लॉट काढून टाकले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायती शेती करतात. द्राक्ष, डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू या फळपिकांसह ढोबळी मिरची, टोमॅटो यासारखी जोखमीची पिके घेण्याकडे तरुण शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र हमीभाव मिळत नसल्याने अनेकवेळा आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. टोमॅटोच्या बाबतीतही तेच होत आहे. गेल्या महिन्यापासून टोमॅटोचे दर गडगडल्याने मिळणाऱ्या भावातून प्रवासखर्चही निघत नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नुकतेच सुरू झालेले टोमॅटोचे प्लॉट सोडून दिले आहेत. तर काहींनी ते उपटून काढून टाकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दर गडगडल्याने व्यापाऱयांनी टोमॅटोची खरेदी कमी केली आहे. काही व्यापाऱ्यांनी तर शेतकऱयांना टोमॅटो बाजारात पाठवूच नका किंवा अतिशय कमी प्रमाणात पाठवा असे सांगितले आहे. त्यामुळे काढलेल्या टोमॅटोचे काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

ज्यूस कंपन्यांकडून अडवणूक
ज्यूस कंपन्यांकडून लाल टोमॅटो 2 रुपये किलो दराने खरेदी केला जात आहे. सध्या टोमॅटोचे दर गडगडल्याने ज्यूस कंपनी मालकांकडून पैशांसाठी शेतकऱ्यांना एक महिन्यांची मुदत दिली जात आहे. एकप्रकारे अडवणूकच केली जात असल्याचे दिसत आहे.