‘त्या’ तीन कृषीकन्येची “मातोश्री” ने घेतली दखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुनतांब्यात गेल्या 5 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन केले आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुलींच्या आंदोलनाची दखल घेत त्यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुणतांब्यात जाऊन आंदोलन करत्या मुलींशी उद्धव ठाकरे यांचे बोलणे करून दिले आहे.

शेतकऱ्यांच्या काही मागणीसाठी पुणतांब्यातील तीन शेतकऱ्यांच्या मुलींनी काही दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा हा ५ वा दिवस आहे. या आंदोलनात तिन्ही मुलींची प्रकृती खालावली आहे. शुभागी जाधव हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही तिने अन्यत्याग आंदोलन सुरूच ठेवले होते. विशेष म्हणजे ५ दिवस झाले तरी सरकारने त्यांची दखल घेतली नाही. दरम्यान आंदोलनाच्या आज पाचव्यादिवशी राज्यमंत्री राम शिंदे यांनी या तिन्ही मुलींची भेट घेतली आणि उपोषण सोडण्यास विनंती केली. मात्र, या मुलींनी ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत असे म्हंटले आहे.

याचदरम्यान शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुणतांब्यात जाऊन आंदोलन करत्या मुलींशी संवाद साधला, त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन द्वारे संपर्क साधला आणि तिन्ही मुलींचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. इतकेच नव्हे तर, जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर उद्या पुणतांब्यात या मुलींची भेट घेणार आहेत.

विशेष म्हणजे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आज दुपारी या मुलींची भेट घेतली होती. मुलींच्या या आंदोलनावरून त्यांनी सरकार संवेदनशील नसल्याची टीका केली होती. वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार चिकडगावकर, स्वाभिमानी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांच्यासह अनेक जणांनी या मुलींची भेट घेतली.

शुभांगी जाधव, निकिता जाधव आणि पूनम जाधव या तिघांनीही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गेल्या 5 दिवसांपासून अन्नाचा त्याग केला आहे.

आंदोलन करता मुलींच्या मागण्या काय ?

शेतीमालाला हमीभाव

कोणत्याही अटीशर्थी शिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी

दुधाला 50 रुपये भाव द्यावा

शेतकऱ्यांना मोफत वीज

कृषीपंपाचे वाटप करावे