हातकणंगलेत शेतकऱ्यांच्या नेत्याकडे शेतकऱ्यांनीच फिरवली पाठ ; जाणून घ्या विधानसभा निहाय मतदान

हातकणंगले : पोलीसनामा ऑनलाईन – हातकणंगले लोकसभा मतदार संघात यंदाची लढत ही चुरशीची ठरली. या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विद्यमान खासदार राजू शेट्टी तर शिवसेनेकडून धैर्यशील माने यांच्यात प्रमुख लढत रंगली. २०१४ च्या निवडणुकीत भाजप सोबत लढून राजु शेट्टी यांनी खासदारकी मिळवली होती . मात्र यंदा त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने यांना ५,८५,७७६ मते मिळाली. तर राजु शेट्टी यांना ४,८७,२७६ मते मिळली. धैर्यशील माने हे ९६,०३९मतांनी विजयी झाले.

हातकणंगले मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. कारण हा संपूर्ण भाग साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. यंदा माध्यमांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार या मतदार संघात राजू शेट्टीच विजयी होणार हे ‘फिक्स’ होते. मात्र हातकणंगलेचा निकाल अतिशय धक्कादायक लागला. शेतकऱ्यांसाठी लढणारे ,शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे राजु शेट्टींकडे यंदा शेतकऱ्यांनीच पाठ फिरवली. २००० साली राजु शेट्टी यांनी राजकीय क्षेत्रात उडी घेतली. ऊसाला आणि दुधाला भाव देण्यासाठी राजू शेट्टी यांनी अनेक आंदोलने केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या ताकदीने त्यांना २००९ साली थेट संसदेत पाठवले. त्यानंतर २०१४ साली देखील त्यांना जनतेचा कौल मिळला. पण २०१४ नंतर मात्र परिस्थिती बदलायला लागली. राजू शेट्टींनी ज्या कारखानदारांविरोधात लढून शेतकऱ्यांची मते मिळवली होती त्याच कारखानदारांशी सलगी केल्यामुळे बराच शेतकरी वर्ग त्यांच्यावर नाराज होता. जिकून येणारच हा अतिआत्मविश्वास राजू शेट्टी यांना नडला.

आपलीच माणसं विरोधात गेली
एके काळी शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते राजू शेट्टी यांची सावली बनून राहणारे सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर राजू शेट्टींची साथ सोडली. पण त्यानंतर मात्र सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना पराभूत करण्यासाठी चंगच बांधला. एवढेच काय राजू शेट्टी यांच्या विरोधात प्रचारासाठी ते मैदानात उतरले. स्वतः राजू शेट्टींविरोधात भाषणे केली. तसेच धैर्यशील माने यांना मत देण्यासाठीचे आवाहन केले. याचा फटका यंदाच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना बसला.

तरुणाईच ठरली धैर्यशील मानेंच्या विजयाचा फॅक्टर

  • राजु शेट्टींसारख्या तगड्या उमेदवारापुढे धैर्यशील मानेंसारखा नवखा उमेदवार देऊन शिवसेनेने मोठं धाडस केलं होतं मात्र येथे अनपेक्षितपणे शिवसेनेने बाजी मारली. धैर्यशील मानेंना विजयी करण्यासाठी तरुणाई हा मोठा फॅक्टर ठरला.
  • या मतदार संघात धैर्यशील मानेंना जातीय समीकरणासाठी जनतेने मते दिली असे देखील सांगण्यात येत आहे.
  • ‘विकासाची एकतरी संधी द्या’ ही भूमिका घेऊन धैर्यशील माने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. दुसरीकडे राजु शेट्टी यांनी या मतदार संघात विजय आपलाच आहे अशा अतिआत्मविश्वासामुळे प्रचाराकडे कमी लक्ष दिले. त्याचवेळी त्यांचे लक्ष सांगली मतदार संघाकडे होते. त्यामुळे धैर्यशील यांनी प्रभावी प्रचार केला आणि त्याचे फलित आज धैर्यशील यांना मिळले.
  • या मतदारसंघात धैर्यशील यांना निवडून आणण्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीने मोठी ताकद लावली होती. एकत्र येऊन त्यांनी याठिकाणी काम केले होते.

विधानसभा निहाय आकडेवारी

मतदार संघ धैर्यशील माने राजू शेट्टी

शाहूवाडी ५१,३१३ ३७,१०७

हातकणंगले ७१,५३८ ४५,७५१

इचलकरंजी ८९,७९२ ३७,४५२

शिरोळ ६०,८२२ ६३,९०१

इस्लामपूर ५३,३७२ ६३,७०७

शिराळा ४३,४६० ५१,७८८