‘मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत’, आंदोलनाला पाठिंबा देत DIG यांचा राजीनामा

चंदीगड : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु असताना पंजाबच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने पंजाब पोलीस (Punjab Police) दलात खळबळ उडाली आहे. लखविदरसिंह जाखड (Lakhvinder Singh Jakhar) असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते पंजाब पोलीस उपमहानिरीक्षक (तुरुंग) (DIG Prisons) आहेत. आपण शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांना समर्थन (Support of Farmers) देत त्यांनी आपला राजीनामा राज्याच्या प्रधान सचिवांकडे (गृह) सुपूर्द केला आहे.

जाखड यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहत सेवेतून अकाली सेवानिवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांसोबत मी आहे आणि याच कारणासाठी आपण राजीनामा देत असल्याचे जाखड यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.

यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लखविंदर जाखड हे सध्या निलंबित आहेत. काही महिन्यापूर्वी तरुंग अधिकाऱ्याकडून कथित स्वरुपात लाच स्वीकारण्याचा आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.