Farmers Protest : निवडणुकांमध्ये शेतकरी संघटना करणार भाजप विरोधात प्रचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आता शेतकरी संघटनांनी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला घेरण्याची शेतकरी संघटनांनी तयारी सुरु केली आहे. आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीत शेतकरी संघटना भाजप विरोधात प्रचार करणार आहेत.

पुढच्या महिन्यामध्ये तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि आसाम या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांसाठी भाजपने मोठी ताकद लावली आहे. तर पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. अशातच कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने मोठी घोषणा केली आहे. भाजपला मतदान करु नका, असे आवाहन पाच राज्यातील निवडणूकांमध्ये करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली आहे.

स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी सांगितले की,10 कामगार संघटनांसोबत आमची बैठक झाली आहे. सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात 15 मार्चला कामगार आणि कर्मचारी रस्त्यांवर उतरतील आणि रेल्वे स्थानकांबाहेर धरणे आंदोलन करतील. सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र केंद्र सरकारमध्ये हरयाणाचे जे तीन केंद्रीय मंत्री आहेत.त्या मंत्र्यांना त्यांच्या गावात प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचा इशारा यादव यांनी दिला.

6 मार्चला वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको

योगेंद्र यादव यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाची आज बैठक झाली असून या बैठकीत 15 मार्चच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. दरम्यान, शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला 6 मार्च रोजी 100 दिवस पूर्ण होत आहेत. या दिवशी शेतकरी सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीत कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस वेवर वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.