शेतकरी आंदोलनामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये जिओ जबरदस्त फटका, लाखो ग्राहक झाले कमी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : असे म्हणतात ना जेव्हा एकाचे नुकसान होते, तेव्हा दुसऱ्याला त्याचा फायदा होतो. नवीन कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये असेच काही पाहायला मिळाले. या आंदोलनामुळे दोन्ही राज्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे, तर एअरटेल आणि वीआयने त्याचा फायदा घेतला आहे. टेलिकॉम नियामक ट्रायच्या आकडेवारीनुसार, हरियाणामध्ये रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या नोव्हेंबरमध्ये 94.48 लाख होती, ती डिसेंबरमध्ये 89.07 लाखांवर आली. त्याच वेळी, एअरटेलचे राज्यात 49.56 लाख ग्राहक होते, जे डिसेंबरमध्ये वाढून 50.79 लाख झाले आहेत. व्हीआय (व्होडाफोन आयडिया) च्या ग्राहकांची संख्या 80.23 लाखांवरून 80.42 लाखांवर गेली आहे.

पंजाबमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यात जिओच्या ग्राहकांची संख्या घसरली आहे. नोव्हेंबरमध्ये कंपनीचे 1.40 कोटी ग्राहक होते, ते डिसेंबरमध्ये 1.24 कोटींवर आले आहेत. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये वीच्या ग्राहकांची संख्या 86.42 लाख होती, ती डिसेंबरमध्ये वाढून 87.11 लाखांवर गेली. राज्यात एअरटेलचे ग्राहकही वाढले आहेत. त्यांची संख्या नोव्हेंबरमध्ये 1.05 कोटी होती, ती डिसेंबरमध्ये वाढून 1.06 कोटी झाली. एवढेच नव्हे तर सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देखील यामुळे बाजी मारली आहे. दोन्ही राज्यांतील शेतकरी चळवळीचा कंपनीला फायदा झाला असून ग्राहकांची संख्या वाढली आहे. रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी आहे ज्यांचे ग्राहक या दोन राज्यात कमी झाले आहेत.

देशभरात वाढले Jio चे ग्राहक
दरम्यान, जिओला केवळ या दोन राज्यातच ग्राहकांचे नुकसान सहन करावे लागले. या व्यतिरिक्त इतर सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये त्यांच्या ग्राहकांची संख्या चांगलीच वाढली आहे. त्याच वेळी, केवळ हरियाणा आणि पंजाबमध्येच ग्राहकांच्या संख्येत फायदा झाला आहे, अन्यथा इतर सर्व सर्कलमध्ये त्याचे ग्राहक कमी झाले आहेत. एअरटेल ही एकमेव कंपनी आहे जिचे ग्राहक सर्वत्र वाढले आहेत. मुकेश अंबानीचा रिलायन्स ग्रुप आणि गौतम अदानीच्या अदानी ग्रुपला कृषी कायद्याचा फायदा होईल, यामुळे शेतकरी शेती कायद्याबरोबरच या दोन्ही कंपन्यांवर बहिष्कार घालत आहेत. आपला निषेध नोंदविण्यासाठी शेतकरी संघटनांनी जिओ कनेक्शन सोडण्याचे आवाहन केले आहे, त्यानंतर या दोन राज्यांतील लोकांनी मोठ्या संख्येने जिओवरून इतर कंपन्यांची सेवा स्वीकारली आहे.