दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा हल्लाबोल! मुंबईत आज होणार मोठी रॅली, हजारो शेतकरी करणार कृषी कायद्याला विरोध

मुंबई : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज म्हणजे सोमवारी मुंबईच्या आझाद मैदानात एक रॅली होणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारोच्या संख्येने शेतकरी मुंबईत पोहचले आहेत. पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, शेतकरी रॅलीमुळे (Farmers Rally ) पोलिसांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि परिसरात विशेष बंदोबस्त तैनात केला आहे आणि राज्य राखीव दलाचे जवान (एसआरपीएफ) सुद्धा तैनात केले आहेत, यासोबतच ड्रोनचा वापर सुद्धा केला जाईल.

ऑल इंडिया किसान सभा (एआयकेएस) च्या महाराष्ट्र शाखेने वक्तव्य जारी करून म्हटले आहे की, नाशिकहून सुमारे 15 हजार शेतकरी शनिवारी टेम्पो आणि अन्य वाहनांनी मुंबईसाठी रवाना झाले आहेत. सोमवारी होणार्‍या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीचे काही प्रमुख नेते संबोधित करणार आहेत. राज्य सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने अगोदरच या रॅलीला समर्थन दिले आहे.

एआयकेएसने म्हटले की, विविध भागातून शेतकरी नाशिकमध्ये जमा झाले आणि शनिवारी मुंबईसाठी रवाना झाले, प्रवासात आणखी हजारो शेतकरी यामध्ये सहभागी झाले. मुंबईसाठी निघालेल्या शेतकर्‍यांनी रात्री इगतपुरीजवळ घाटनदेवी येथे वस्ती केली होती. रविवारी सकाळी शेतकरी कसारा घाट रस्त्याने मुंबईसाठी रवाना झाले. येथे अनेक महिला शेतकरी सुद्धा त्यांच्यात सहभागी झाल्या.

कसारा घाटातील मार्चचे नेतृत्व एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि राज्य युनिटचे प्रमुख किसन गुज्जर आणि महासचिव अजित नवले यांनी केले. भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू) शी संबंधीत इगतपुरी आणि शहापुर तालुक्यातील फॅक्टरी कामगारांनी या शेतकर्‍यांवर पुष्पवर्षाव करून स्वागत केले. कल्याण-भिवंडी क्रॉसिंगवर सुद्धा शेतकर्‍यांचे स्वागत करण्यात आले आणि जेवणाची पॅकेट्स वितरित करण्यात आली. शेतकरी मुलुंड तपासणी चौकीच्या मार्गाने मुंबईत दाखल झाले. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये या मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

यानंतर शेतकरी आझाद मैदानाकडे निघाले. ज्या ठिकाणी ते संयुक्त शेतकार कामगार मोर्चा (एसएसकेएम) च्या बॅनरखाली आयोजित धरणे आंदोलनात सहभागी होतील, जे प्रजासत्ताक दिनापर्यंत जारी राहील. वक्तव्यात सांगण्यात आले की, ही रॅली दिल्लीत कृषी कायदे रद्द करणे, किमान अधारभूत मूल्य (एमएसपी) ची गॅरंटी आणि संपूर्ण देशात पीक खरेदीच्या मागणीसाठी आंदोलन करत असेलेल्या शेतकर्‍यांच्या समर्थनासाठी केली जात आहे.

उल्लेखनीय म्हणजे शेतकरी समर्थक संघटना संयुक्त किसान मोर्चाने 23 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत सर्व राज्यांच्या राजभवनांसह संपूर्ण देशात आंदोलन करण्याचे आव्हान केले आहे. याच अंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 100 संघटनांनी 12 जानेवारीला मुंबईत झालेल्या बैठकीत संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची स्थापना केली. वक्तव्यानुसार, 25 जानेवारीला 11 वाजता आझाद मैदानात रॅली सुरू होईल आणि शरद पवार यांच्यासह प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा रॅलीला संबोधित करतील.

यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी राजभवनाकडे मार्च करतील आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन देतील. आंदोलनकर्त्यांनी 26 जानेवारीला आझाद मैदानात तिरंगा फडकवणे आणि शेतकरी तसेच कामगारांचा संघर्ष यशस्वी करण्याची शपथ घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, रॅलीमुळे सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आझाद मैदानात एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून ड्रोनने देखरेख केली जाईल. रॅलीच्या ठिकाणी 100 अधिकारी आणि 500 कॉन्स्टेबल तैनात असतील.