अर्थमंत्री अजित पवार म्हणाले – ‘शेतकर्‍यांनो, वीज बिल भरायला शिका’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकर्‍यांना म्हटले की, महाविकास आघाडी सरकारने तुम्हाला कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला आहे. आता तरी आकडे टाकणे बंद करा आणि वीज बिल भरायला शिका. नगरमधील कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे राज्य सरकारतर्फे आयोजित महाराजस्व अभियानात पवार बोलत होते. यावेळी सरकारी योजनांतील लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात मी जिकडे जातो, तिकडे वीजचोरीसाठी टाकलेले आकडे पाहतो. आकडे टाकून चोरीची वीज घेणे चांगले नाही. वीज वितरण कंपनी अडचणीत आहे. थकबाकी आणि कर्जही वाढत आहे. तुम्हाला राज्य सरकारने कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आता वीज बिले भरायला शिकावे.

स्थानिक खासदार डॉ. सुजय विखे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नसल्याबाबत सुरू असलेल्या चर्चेचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले, हा कार्यक्रम राज्य सरकारचा आहे. त्यामुळे खासदारांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावताना ते म्हणाले, विखे यांना सूर्य तिकडे उगवेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही आणि त्यांची फसगत झाली. अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो. कर्जत-जामखेड मतदारसंघातून तुम्ही रोहित पवार यांना निवडून दिले आहे. आता तुमची जबाबदारी संपली, आमची सुरू झाली आहे. येथील पोलीस आणि प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली काम करू नये. चांगले काम न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल.

सीएएवर अजित पवार म्हणाले, सीएए, एनआरसीचा महाराष्ट्रात कोणालाही, कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही, याची खात्री आमचे सरकार देत आहे. तर महिला सुरक्षेबाबत बोलातना ते म्हणाले की, राज्यात महिलांच्या सुरेक्षेसाठी कडक कायदा आम्ही करणार आहोत. यापुढे मुलींकडे वाकड्या नजरने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. शिवाय, विधानसभा, लोकसभेतही महिलांना आरक्षण देण्याची मागणी आम्ही करणार आहोत. मात्र यासाठी देशपातळीवर एकमत आवश्यक आहे.