किसान रेल्वेद्वारे शेतकरी बांधवांनी परराज्यात शेतीमाल पाठवावा : सौ. सुवर्णा जगताप

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन –   देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला शेतकरी बांधव व व्यापारी वर्गाकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लासलगांव व परीसरातील शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल कमी वेळेत परराज्यात पाठविणेसाठी किसान रेल्वेला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन लासलगांव बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी केले.

शेतकरी बांधव व व्यापारी वर्गास त्यांचा शेतीमाल पाठविणेसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या किसान रेल्वेचे महत्व पटवुन देणेसाठी आज सोमवार, दि. 31 रोजी लासलगांव बाजार समितीच्या कार्यालयात टोमॅटो, डाळींब व भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांसह व्यापारी वर्गाची बैठक बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांचे अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. सदर बैठकीत रेल्वेचे अधिकारी व्ही. एस. भालेराव व व्ही. बी. जोशी यांनी उपस्थितांना सदर रेल्वेद्वारे कोण-कोणत्या ठिकाणी माल पाठविता येईल, त्यासाठी लागणारा कालावधी, त्याचे भाडे दर, गाडीची वेळ व वार, मालाचे संरक्षण, रेल्वे बोगीत कशाप्रकारे मालाची साठवणुक केली जाईल. बुकींगसाठी कोणाकडे संपर्क साधावा याबाबत सविस्तर माहिती दिली.

त्यानुसार सदर बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे उपस्थितांनी सदर किसान रेल्वेला लासलगांवी थांबा मिळाल्यास लासलगांव रेल्वे स्थानकावरून साधारणतः 10 ते 15 टनापर्यंत कांदा, टोमॅटो, डाळींब व इतर प्रकारचा भाजीपाला परराज्यात पाठविण्याची तयारी दर्शविली.

सदर किसान रेल्वेद्वारे परराज्यात माल पाठविण्यासाठी शेतकरी बांधव व व्यापारी वर्गाने लासलगांव रेल्वे स्टेशनचे मुख्य पार्सल तथा बुकींग पर्यवेक्षक व्ही. बी. जोशी यांचेशी 9921292199 / 9503011982 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सभापती सौ. जगताप यांनी केले.

यावेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव, कांदा, टोमॅटो, डाळींब व भाजीपाला व्यापारी, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, रेल्वेचे अधिकारी ए. बी. माळवे, स्नेहल सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, सहाय्यक सचिव सुदीन टर्ले, प्रकाश कुमावत, लेखापाल अशोक गायकवाड, सुरेश विखे, पंकज होळकर, सचिन वाघ, आदी उपस्थित होते.

लासलगांव स्टेशनवरून कोठे पाठविता येईल शेतीमाल (कंसात भाडे दर प्रति क्विंटलचे) :-

जबलपुर (रू. 220.94), कटनी (रू. 247.65), सतना (रू. 267.35), माणिकपुर (रू. 291.26), मुगलसराय (रू. 345.84), बक्सर (रू. 368.56), दानापुर (रू. 390.28), मुझफ्फरपुर (रू. 408.39)