‘भाजपला मतदान करू नका’ ; सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

डेहरादून : वृत्तसंस्था – सध्या देशातील मोठी समस्या ही शेतकऱ्यांची आत्महत्या आहे. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात एका शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या नोटमध्ये त्याने भाजपला मतदान करू नका, असा संदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या शेतकऱ्याचे नाव ईश्वरचंद्र शर्मा असे असून त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांनी मंगळवारी पाहटे विष पिऊन आत्महत्या केली.

ईश्वरचंद्र हे हरिद्वार जिल्ह्यातील दडकी या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी विष घेतल्याचे लक्षात येताच त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांना उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे भाजपाला मतदान करू नका, अन्यथा ते प्रत्येकाला चहा विकायला लावतील, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहीलं आहे. पोलिसांनी तपास करत या सुसाईड नोटची खातरजमा करून घेत आहेत.

तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांना शेतीसाठी कर्ज हवे होते. त्यासाठी एका मध्यस्थी माणसाने कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांना मदत केली. मात्र, त्याचा मोबदल्यात त्याने शर्मा यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्याला मॅनेज करायचं असल्याने ४ लाख रुपयांची मागणी या दलालाने केली होती, असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

शर्मा यांना ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले, मात्र हे पैसे त्या दलालानेच हडप केले. शर्मा यांच्याकडून त्याने ब्लँक चेक सही करून घेतला होता. त्यामुळे कर्जाची रक्कम शर्मा यांच्या अकाऊंटमध्ये जमा होताच, त्याने ती रक्कम काढून घेतली, असंही या नोटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसंच यात काँग्रेसने भाजपला जबाबदार धरले आहे. भाजपने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे.