कृषी कायदे रद्द करण्याची मागणी; आंदोलक शेतकऱ्यांनी PM मोदींना लिहिली रक्ताने पत्रे

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सिंघू सीमेवर पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आंदोलन करत आहे. अदयाप तोडगा निघाला नाही दरम्यान आंदोलकांनी नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारी स्वत:च्या रक्तानं लिहीलेली पत्रं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली आहेत.

आंदोलनस्थळी रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांच्या एका गटानं चक्क स्वत:च्या रक्तानं पंतप्रधान मोदींना पत्र लिहायचं ठरवलं. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील तीव्र विरोध पंतप्रधान मोदींच्या लक्षात यावा यासाठी रक्तानं पत्र लिहीण्याचा निर्णय घेतल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

काय लिहीलंय पत्रात?
“सुप्रभात नरेंद्र मोदीजी. आम्ही आमच्या रक्तानं हे पत्र तुम्हाला लिहीत आहोत. तुम्ही देशाचे पंतप्रधान असून आमच्या मतांनी तुम्ही निवडून आले आहात. तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी देऊन तुम्ही शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. हे कायदे मागे घेण्याची तुम्हाला कळकळीची विनंती”, असं शेतकऱ्यांनी पत्रात लिहीलं आहे.