UP च्या फर्रूखाबादमध्ये 11 तासांपर्यंत 23 मुलांना ‘ओलिस’ ठेवणार्‍या माथेफिरूच्या पत्नीला जमावानं ‘बेदम’ मारहाण करून मारून टाकलं

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद येथील एका घटनेला पोलिसांनी यशस्वीपणे संपवले आहे आणि मुलांना बंदी बनवणाऱ्या सुभाष बाथमचा इन्काउंटर केला आहे. आरोपीला मारल्यानंतर त्यांच्या पत्नीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक नागरिकांनी पत्नी रुबीला पकडले आणि चांगलाच चोप दिला. पोलिसांनी रुबीला लोकांच्या तावडीतून वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला.

कानपूरच्या आयजी मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, जमावाच्या तावडीतून वाचवून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादम्यान तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टमधे स्पष्ट होईल की, महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेवीस मुलांना वाचवणाऱ्या युपी पोलिसांच्या टीमला दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मारलेल्या व्यक्तीवर या आधी देखील हत्येचा आरोप होता अशी माहिती डीजीपी ओपी सिंह यांनी दिली.

अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी यांनी सांगितले की सर्व मुले सुखरूप आहेत. मुलांना घरात बंदी बनवल्यामुळे ऑपरेशनला जास्त वेळ लागला. सर्व 23 मुले पूर्णपणे सुरक्षित आहेत. चकमकीमध्ये पोलिसांनी आरोपी सुभाष बाथमला ठार केले आहे. ते म्हणाले की हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे.

सुभाष बाथमने गुरुवारी दुपारी 23 मुलांना आपल्या घरी जन्म दिवसाचे कारण सांगून बोलवले. त्यानंतर त्याने त्या सर्व मुलांना बंदी बनवले त्यानंतर आरोपीशी बोलण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला तर त्याने फायरिंग सुरु केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संपूर्ण परिसराला घेराव टाकला आणि माथेफिरूच्या तावडीतून मुलांची सुटका केली.