उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये 20 जण घरात ‘ओलीस’, ATS ला केलं पाचारण

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील मोहम्मदाबादमध्ये एका आरोपीने 20 लहान मुलांना ओलीस ठेवले आहे. स्थानिक आमदार आणि काही अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी या आरोपीने केली आहे. लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीने पोलीसांवर गोळीबार केला तसेच ग्रेनेड फेकल्याची माहिती समोर आली आहे.

मोहम्मदाबाद परिसरातील एका वस्तीमध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका घरात हा माथेफिरू शिरला. त्यावेळी त्याने वीस जणांना घरामध्ये ओलीस ठेवले. यामध्ये 15 लहान मुले आणि पाच महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याला आवाहन करताच त्या माफेफिरूने कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

माथेफिरूने पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने ग्रेनेड देखील पोलिसांच्या दिशेने फेकले. बॉम्बच्या स्फोटात एका घराची भिंत कोसळली आहे. यामध्ये दोन पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घराभोवती वेढा घातला असून सायंकाळपर्यंत पोलिसांना ओलिसांची सुटका करण्यात अपयश आले आहे. माफेफिरुने ओलीस ठेवलेल्या मुलांची आणि महिलांची सुटका करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती कानपूर मंडळाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली.