केंद्र सरकारनं आता जुन्या वाहनांसाठी बदलला ‘हा’ नियम, FASTag लावणं केलं अनिवार्य, जाणून घ्या कुठून खरेदी करायचा फास्टॅग

नवी दिल्ली : देशभरातील टोल प्लाझावर डिजिटल आणि आयटी आधारित पेमेंट सिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने नोटिफिकेशन जारी करून स्पष्ट आदेश दिला आहे की, आता 1 जानेवारी 2021 पासून जुन्या गाड्यांवर सुद्धा फास्टॅग लावणे बंधनकारक केले आहे. आदेशानुसार, 1 डिसेंबर 2017 पासून विकल्या गेलेल्या एम आणि एन कॅटेगरीच्या वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य असेल. केंद्राने यासाठी केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 (सीएमव्हीआर, 1989) मध्ये बदल केला आहे.

असा आहे केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989
नियमानुसार, 1 जानेवारी 2017 च्यानंतर विकल्या गेलेल्या वाहनांवर फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. सर्व नव्या चारचाकी वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी हे अनिवार्य करण्यात आले होते. यामध्ये व्यवस्था करण्यात आली होती की ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी फास्टॅग लावण्यानंतरच फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू केले जाईल. 1 ऑक्टोबर 2020 पासून वाहनांच्या नॅशनल परमिटसाठी फास्टॅग लावावा लागेल. याशिवाय वाहनांचा फॉर्म-51 द्वारे नवा थर्ड पार्टी इन्श्युरन्स करण्यासाठी सुद्धा 1 एप्रिल 2021 च्यानंतर फास्टॅग लावणे अनिवार्य असेल. फॉर्ममध्ये फास्टॅग आयडी नोंदवावा लागेल.

फास्टॅगमुळे वाहन चालकांना हा होईल फायदा
वाहनांमध्ये फास्टॅग लावल्याने टोल प्लाझावर वेळेची बचत होईल. विनाकारण संपणार्‍या इंधनाची बचत होईल. केंद्र सरकार सुद्धा टोल प्लाझावर इलेक्ट्रॉनिक मोडने 100 टक्के टॅक्स घेण्याच्या दृष्टीने विचार करत आहे. फास्टॅग ऑनलाइनसह अनेक ठिकाणी ऑफलाइन सुद्धा उपलब्ध आहे. वाहनांवर फास्टॅग लावण्यासाठी लोकांकडे सुमारे 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

असा खरेदी करा फास्टॅग
राष्ट्रीय राज्यमार्ग प्लाझा आणि 22 विविध बँकंमधून फास्टॅग स्टिकर खरेदी करता येते. हे पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे.

असा रिचार्ज करा फास्टॅग
जर फास्टॅग एनएचएआय प्रीपेड वॉलेटशी जोडलेला आहे, तर तो चेकच्या माध्यमातून किंवा युपीआय/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/एनईएफटी/नेट बँकिंग इत्यादीच्या माध्यमातून रिचार्ज करू शकता.

जर बँक खात्याला फास्टॅग लिंक असेल, तर पैसे थेट खात्यातून कापले जातात.

जर पेटीएम वॉलेटला फास्टॅग लिंग असेल, तर पैसे थेट वॉलेटमधून कापले जातात.

दोन वाहनांसाठी दोन वेगवेगळे फास्टॅग खरेदी करावे लागतील.