लॉकडाऊनमुळे फास्टफूड विक्रेत्यांवरही संक्रांत, कोरोनाच्या संकटामुळं कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर आणि उपनगरामधील धावपळीच्या वातावरणात झटपट अन्नपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या शेकडो फास्ट फूड विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेले जीवन त्याचबरोबर आरोग्यविषयी नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती पाहता भविष्यातदेखील आपला व्यवसाय सुखरूप नसल्याची भावना या विक्रेयाच्या मनात निर्माण झाली आहे.

पुणे शहर-उपनगर आणि लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे झटपट मिळणाऱ्या अन्न पदार्थातून भूक भागवणाऱ्या पदार्थाची मागणी अधिक आहे. या भागात पाणीपुरी, सँडविच, वडापाव, भाजी पाव, आणि चायनिज अशा ‘फास्ट फूड’ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे विक्रते रस्त्याच्या कडेला अथवा एखाद्या दुकानात या पदार्थाची विक्री करून आपली उपजीविका भागवत होते. परंतु करोनाचे विषाणूच्या संकटामुळे जग हादरून गेले आणि 24 मार्चपासून देशभर लॉकडाऊन केले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या फास्टफुड वर्गावर कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ आली आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असली तरी रस्त्याच्या कडेला तसेच दुकानात गर्दी होऊ नये, म्हणून राज्य शासनाकडून खाद्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोतच बंद पडला गेल्यामुळे अनेक ‘फास्ट फूड’ विक्रेते कामाच्या शोधात फिरत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या दुकानाच्या किराया बोजा उचलून कर्जबाजारी झालेले छोटे व्यावसयिक हतबल झाले आहेत. शिवाय नागरिकांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थाविषयी निर्माण झालेली नकारात्मक भूमिका भविष्यातदेखील आपल्याला हानी पोहचवू शकते, अशी भीती या विक्रेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे फास्टफूड व्यवसायाला कायमचे रामराम ठोकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

फास्टफुड सुविधेला विरोध
फास्टफूड विक्रते रस्त्याच्या कडेला अथवा एखाद्या दुकानात या पदार्थाची विक्री करून आपली उपजीविका करत होते. कोरोनामुळे पूर्णत: कामं बंद झाल्यामुळे अनेक ‘फास्ट फूड’ विक्रेते स्वत: ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना घरपोच सुविधा देण्याचे काम करत होते. परंतु बाहेरील व्यक्ती तसेच खाद्यपदार्थ घेऊन गृहसंकुलात येत असल्यामुळे अनेक सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून अशा विक्रेत्यास बंदी घातली गेली आहे. त्यामुळे घरपोच सुविधा देण्याच्या पर्यायालादेखील ग्रहण लागत आहे. आता त्यांच्यापुढे कोणताच पर्याय राहिलेला नाही आहे.

* चंद्रकांत पवार, मगरपट्टा- वडापाव विक्रेता – मागिल अनेक वर्षांपासून वडा-पाव विक्री करत आहे. माझ्या कुटुंबीयांचा खर्च त्यातून भागवला जात होता. परंतु आता माझे उत्पन्नच बंद झाल्यामुळे उपाशी राहायची वेळ माझ्या कुटुंबीयांवर आली आहे.